गुगलच्या क्लाऊड बेस्ड स्टोअरेज ड्राईव्ह ची प्रतीक्षा अखेर संपली

 अॅप्सच्या ड्रॉपबॉक्स, मायक्रोसॉफ्टच्या स्काय ड्राईव्ह आणि अॅपलच्या आय क्लाऊड या लोकप्रिय ड्राईव्ह शी स्पर्धा करण्यासाठी गुगलनेही आता आपला ड्राईव्ह लाँच केला असून ग्राहक या ड्राईव्ह साठी अनेक आठवडे प्रतीक्षा करत होते.गुगलने मंगळवारी ही सेवा सुरू केली असून सुरवातीला युजर्सना पाच जीबी डेटा या क्लाऊडमध्ये मोफत साठविण्याची सवलत देण्यात आली आहे. गुगलच्या सर्व्हरमध्येच हा डेटा साठविता येणार आहे.
  अर्थात सुरवातीला फक्त अँडड्रॉइड उपकरणे आणि पीसी व एमएसी साठीच ही सेवा देण्यात येत असली तरी कांही काळानंतर ती आयफोन आणि आयपॅडसाठीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. गुगलच्या क्रोम व अॅप्सचे उपाध्यक्ष सुंदर पिचई या संदर्भात आपल्या ब्लॉगवर म्हणतात की कदाचित तुम्ही लाँच नेस मॉन्स्टर प्रमाणेच गुगल ड्राईव्ह बद्दलच्या अफवा ऐकल्या असतील. मात्र आज आम्ही गुगल ड्राईव्ह तुमच्यासाठी प्रत्यक्षात सादर करतो आहोत. येथे तुम्ही नवनिर्मिती, शेअरिंग, कोऑर्डिनेशन करू शकणार आहातच पण तुमचा सर्व मालमसाला साठवूही शकणार आहात. या सेवेमुळे जगाच्या पाठिवरून कुठूनही तुम्ही आवश्यक ती माहिती अपलोडिंग करू शकणार आहात तसेच  तुमच्या फाईल्स, व्हिडीओज, फोटो, गुगल डॉक्युमेंटस, पीडीएफ फाईल्स कुठूनही अॅक्सेसही करू शकणार आहात.
  पिचाई यांच्या म्हणण्याप्रमाणे गुगल ड्राईव्ह गुगल अॅप्सच्या साथीनेच कार्यरत राहणार असल्याने युजर नवी डॉक्युमेंटस, तसेच अस्तित्वात असलेल्या डॉक्युमेंटसचे एडिटिग अॅप्समध्येच करू शकणार आहे. युजरला आमच्या ड्राईव्ह वर अधिक स्पेस हवी असेल तर अगदी माफक दरात ती पुरविली जाणार असून त्यासाठी युजरला २५ जीबीसाठी महिना २.४९ डॉलर्स, १०० जीबीसाठी महिना ४.९९ डॉलर्स तर १ टीबीसाठी फक्त महिना ४९.९९ डॉलर्स मोजावे लागणार आहेत. सध्या युजर ड्राईव्ह मधून फोटो अॅटॅच करू शकणार असले तरी भविष्यात ते जी मेललाही सपोर्ट करू शकणार आहेत.

1 thought on “गुगलच्या क्लाऊड बेस्ड स्टोअरेज ड्राईव्ह ची प्रतीक्षा अखेर संपली”

Leave a Comment