अभिज्ञान, ऐश्‍वर्या नॉर्वेहून अखेर परतले भारतात

नवी दिल्ली, दि. २४ – नॉर्वे सरकारद्वारे आपल्या आई-वडिलांपासून दूर केले गेलेले अभिज्ञान (३) आणि ऐश्‍वर्या (१) मंगळवारी अखेर भारतात परतले. गेल्या वर्षभरापासून पालकांपासून दूर राहिलेल्या या दोन मुलांना आता त्यांचे काका अरूणभाश भट्टाचार्य यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
    अनुरूप आणि सागरीका भट्टाचार्य दांपत्याकडून अभिज्ञान आणि ऐश्‍वर्या या दोन्ही मुलांचे पालनपोषण व्यवस्थितपणे होत नसल्याचे सांगून नॉर्वेतील बालकल्याण विभागाने या मुलांना आपल्या ताब्यात घेतले होते. या प्रकरणावरून भारत आणि नार्वेमध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या पातळीवर चर्चा सुरु होती. दरम्यान, भारताच्या दबावामुळे नॉर्वे प्रशासनाने दोन्ही मुलांना त्यांचे चुलते अरूणभाश यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला.
    यासंदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गेल्या महिन्यात सोल येथे झालेल्या अणुसुरक्षा परिषदेमध्ये नॉर्वेच्या पंतप्रधानांशी चर्चा केली होती. ‘आम्ही सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे. गेल्या वर्षभर आम्ही तणावामध्ये होतो आणि या क्षणाची वाट पाहत होतो’, असे अनुरूप भट्टाचार्य यांनी सांगितले.