करिना, विद्या आणि प्रियांकांनी मोडली बॉलिवूड हिरोंची मक्तेदारी

देशभरात महिलांना समान हक्क आणि दर्जा देण्याबाबत कितीही चर्चा होत असल्या, वाद झडत असले तरी बॉलिवूड इंडस्ट्रीत आजपर्यंत हिरोंच्या तुलनेत हिरॉईनना नेहमीच दुय्यम स्थान मिळाले आहे.मात्र आता करिना, विद्या आणि प्रियांका चोप्रा या त्रयीने हिरोंची मिरासदारी जणू मोडीत काढण्याचा पण केला आहे असे वाटते आहे.

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून या तिघींनी आपले स्वतंत्र स्थान तर निर्माण केलेच आहे पण हिरोंच्या बरोबरीने मानधनाची रक्कमही निर्मात्याकडून वाजवून वसूल केली आहे असे समजते. शाहरूखखान, आमीर, सलमान, अमिताभ, अक्षयकुमार या कलाकारांचे मानधनाचे आकडे कोटींची उड्डाणे पार करत असतानाच करिनाने गत वर्षात आपला दर वाढवून त्यांची बरोबरी केली आहे. तिच्या आगामी हिरॉईनसाठी सात कोटी घेतानाच चित्रपटाच्या व्यवसायातील फायद्यातही आपला वाटा मागणारी ती पहिली अभिनेत्री ठरली आहे.

स्त्रीप्रधान भूमिका असलेल्या चित्रपटांना मिळत असलेल्या यशाचा फायदा विद्यालाही झाला आहे. अर्थात त्यासाठी तिने स्वतःला प्रूव्ह ही केले आहे. कहानी, डर्टी पिक्चर सारख्या सिनेमातून आपला ठळक ठसा उमटविणार्‍या विद्याने आपले मानधन आता सात कोटींवर नेले आहे. तर डॉन टू मधून चमकलेल्या प्रियांकाने जंजीर या गाजलेल्या सिनेमाच्या रिमेकसाठी नऊ कोटी रूपये वाजवून घेतले आहेत. विशेष म्हणजे मागितलेले मानधन मिळत नसेल तर निर्मात्याला चक्क नकार देण्याचे धैर्यही या अभिनेत्री दाखवित आहेत.

Leave a Comment