
दिल्ली दि.२४- सोने व्यापार्यांचा बंद आणि बाजार उघडल्यानंतर सोन्याच्या दरात होत असलेली वाढ यांना न जुमानता आजच्या अक्षय्यतृतीयेच्या मुर्हुतावर देशभरातील ग्राहकांनी सोने खरेदीसाठी झुंबड उडविल्याचे वृत्त आहे.
भारतीयांचे सोने प्रेम जगात प्रसिद्ध आहे. त्यातून हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे पवित्र मानल्या गेलेल्या साडेतीन मुर्हूतांवर सोने खरेदी करण्याची परंपरा आहे आणि सर्व थरांतले भारतीय ही परंपरा मोठ्या निष्ठेने पाळतात. त्यामुळेच आज अक्षय्यतृतीयेच्या मुर्हुतावर सोन्याच्या दराने नवा विक्रम नोंदवूनही ग्राहकांनी सोने खरेदी करण्यात अजिबात हयगय केली नाही. आज बाजारात सोन्याचा भाव चोवीस कॅरेटसाठी २९,१०० वर तर तेवीस कॅरेटसाठी २८,९६० वर होता. मात्र सराफांची दुकाने सकाळपासूनच ग्राहकांनी गजबजली होती. सर्वसामान्य ग्राहकांप्रमाणेच सोन्यात गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांनीही मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली.
परदेशी बाजार कमजोर पडले असल्याच्या पार्श्वभूमीवर सोन्यातील गुंतवणूकीला गुंतवणूकदार पुन्हा प्राधान्य देताना दिसत आहेत. गुंतवणूकदारांची मागणी कॅश करण्यासाठी बीएससी आणि एनएससी ने आपले कामाचे तास आजच्या दिवस वाढवून ते रात्री आठपर्यंत केले आहेत तसेच सोने इटीएफ साठी ट्रान्झॅक्शन चार्जेसही आजच्या दिवसापुरते माफ केले आहेत. नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमि.(एनएसईएल)नेही अक्षय्यतृतीयेसाठी विशेष ऑफर जाहीर केल्या असून त्यात झिरो ट्रान्झॅक्शन चार्जेस तसेच ई गोल्डचे फिजिकल गोल्ड मध्ये रूपांतर करण्यासाठी लागणारे पॅकिंग व मेकींग चार्जेसही माफ केले आहेत. ही ऑफर ई सिल्व्हर आणि ई प्लॅटिनमसाठीही खुली आहे.
आज आठ ग्रॅमच्या सोन्याच्या नाण्यांचा दर २३.५५० रूपयांवर आहे तर चांदी २७५ रूपयांनी घसरून किलोला ५६,३०० रूपयांवर आली आहे. मात्र चांदीच्या १०० नाण्यांसाठीचा दर कायम असून हा दर खरेदीसाठी ६४ हजार रूपये तर विक्रीसाठी ६५ हजार रूपये असा आहे.
———–
