भाजप युवामोर्चा कार्यसमितीची बैठक पुण्यात

पुणे, दि. २१  – भ्रष्टाचार आणि बेकारीने राज्य ग्रासले आहे. जनतेला या त्रासातून सोडविण्यासाठी २०१४ मध्ये राज्यात महायुतीची सत्ता आणण्यासाठी झटून कामाला लागा. यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून तरुणांची शक्ती वाढवा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
    प्रदेश भाजयुमोच्या कार्यसमितीसाठी येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुनगंटीवार यांनी मार्गदर्शन करताना वरील आवाहन केले. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष संभाजी पाटील-निलंगेकर,  सहप्रभारी राजेश पांडे, ज्येष्ठ आमदार गिरीश बापट, देवेंद्र फडणवीस, शहराध्यक्ष विकास मठकरी उपस्थित होते.
    कॉंग्रेसच्या राजवटीत भ्रष्टाचार वाढला आहे. कॉंग्रेसचे मंत्री सासूसाठी फ्लॅट, मेव्हणीसाठी घर घेण्यामध्ये गुंतले असल्याचे सांगत मुनगंटीवार यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर आरोप केला. अशा भ्रष्ट सरकारमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. जनतेला यातून सोडविण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीची सत्ता आणायची आहे. यासाठी भाजयुमोच्या माध्यमातून तरुणांची शक्ती उभी करा.
    नाशिक, ठाणे महापालिकेतील राजकीय तडजोडी हा अर्धवट जनादेशाचा परिपाक आहे. नाशिकमध्ये पक्ष मनसेसोबत गेला. याचा अर्थ आम्ही मनसेसोबत आहोत, असा होत नाही. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे महायुतीमध्ये सहभागी झाल्यास १६५ जागा जिंकू शकतो, असा आमचा विचार झाला होता. परंतु, शिवसेनेने या भूमिकेला पाठिंबा दिला नाही. शिवसेना आमचा मित्र पक्ष असून आम्ही त्यांच्यासोबतच राहाणार आहोत, असा पुनरूच्चारही मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
—————————-
छायाचित्राच्या ओळी – भारतीय जनता युवामोर्चाच्या  प्रदेश कार्यसमितीची दोन दिवसाची बैठक आज पुण्यात सुरु झाली, त्याप्रसंगीच्या भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष संभाजी पाटील-निलंगेकर, सहप्रभारी राजेश पांडे, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार,ज्येष्ठ आमदार गिरीश बापट, देवेंद्र फडणवीस, शहराध्यक्ष विकास मठकरी उपस्थित होते.