
गोंदिया, दि. १९ – सर्व ग्रामपंचायती ऑनलाइन करण्याच्या दृष्टीने ग्रामविकास व जलसंधारण विभागाने ३० एप्रिल २०११ रोजी परिपत्रक काढले. सर्व यंत्रणा सज्ज करण्याचे कंत्राट महाऑनलाइन कंपनीला देण्यात आले. प्रकल्प राबविण्याकरिता जिल्हा ते पंचायत समिती आणि ग्रामस्तरापर्यंत कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, महाऑनलाइनमार्फत कर्मचार्यांना चाळीस हजार वेतनाऐवजी १२ हजार रुपये हातात देण्यात येतात.
जिल्ह्यातील ५५६ ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार सुरू असून कर्मचार्यांनी आपल्याला न्याय द्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. समन्वयकाला ४० हजार, पंचायत समिती अभियंते, ग्रामपंचायत ऑपरेटरला आठ हजार रुपये वेतन देण्याचे निर्देश आहेत, परंतु महाऑनलाइनतर्फे जिल्हा समन्वयकाला १२ हजार, अभियंत्याला सहा हजार आणि ग्रामपंचायतीतील ऑपरेटरला तीन हजार आठशे रुपयांचे धनादेश देण्यात येतात.
