
पुणे, दि. १८- शैक्षणिक परिसरात शंभर मीटर अंतराच्या आत सिगारेटची खुलेआम विक्री केल्याप्रकरणी १९ जणांवर कारवाई करण्यात आली. सिम्बायोसिस विद्यापीठ, लॉ कॉलेज रस्ता आणि गरवारे कॉलेज परिसरातील पान टपर्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यातून ३,८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. सोमनाथ परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने सोमवारी कारवाई केली.
‘सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री कायद्यान्वये’ शहरातील सिंबायोसिस अभिमत विद्यापीठ, एनसीसी कॅन्टीन, लॉ कॉलेज रस्ता, गरवारे कॉलेज परिसरातील पान टपर्यांसह १९ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. शैक्षणिक परिसराच्या शंभर मीटरच्या आत सिगारेटची विक्री करणे गुन्हा आहे. त्यामुळे कारवाईचे सत्र सुरू केले आहे.
