रेडझोऩ हद्दीबाबत ठोस निर्णय नाही बाधित मिळकती, बांधकामांना मोबदल्यासाठी अभ्यास

पिंपरी, दि. १८ – रेडझोन हद्दीबाबत संरक्षण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चेच्या गुर्‍हाळाशिवाय कोणताही ठोस निर्णय झाला नाही. रेडझोनची हद्द ठरविताना बधित होणार्‍या मिळकती किंवा बांधकामासाठी किती मोबदला द्यावा लागणार यासाठी अभ्यास करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे.
    रेडझोन हद्दीच्या प्रश्‍नसंदर्भात नवी दिल्ली येथील कृषींमत्रालयाच्या कक्षात संरक्षण मंत्र्याबरोबर आज बैठक झाली. या बैठकीला संरक्षण राज्यमंत्री एम.एम. पल्लम राजू, कृषीमंत्री शरद पवार, संरक्षण विभागाचे मेजर जनरल व ब्रिगेडीअर, महापौर मोहिनी लांडे, उपमहापौर राजू मिसाळ, पक्षनेत्या मंगला कदम, आमदार लक्ष्मण जगताप, विलास लांडे, जिल्हाधिकारी विकास देशमुख, अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम, सह शहर अभियंता राजन पाटील, नगर रचना उपसंचालक प्रतिभा भदाने, आदी उपस्थित होते.
    उच्च न्यालयाच्या सूचनेप्रमाणे रेडझोनची हद्द ठरविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच सेक्टर २२ मधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला ना हरकत दाखला देण्याबात संरक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्या. तसेच महापालिका हद्दीतील व संरक्षण विभागाच्या मालकीच्या जमिनीतून जाणार्‍या १५ रस्त्याचा आवश्यक तो मोबदला देऊन रस्ता विकसित करण्यास हरकत नसल्याचे संरक्षण मंत्र्याने या बैठकीत सांगितले. मात्र, रेहझोनची हद्द कमी करण्यासंदर्भात या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने महापालिकेच्या हाती निराशा आली. मात्र रेडझोनची हद्द ठरविताना बाधित होणार्‍या मिळकती आणि बांधकामे यासाठी किती मोबदला द्यावा लागेल याबाबत अभ्यास करण्यात येणार असल्याचे संरक्षण राज्य मंत्र्यानी महापालिका पदाधिकार्‍यांना आश्‍वासन दिले.

Leave a Comment