पाकिस्तानातील कैद्यांच्या सुटकेसाठी अधिक प्रयत्नांची गरज

पुणे दि. १६ – पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या नगर जिल्ह्यातील भानुदास कारळे यांच्यासह महाराष्ट्रातील ४७० कैद्यांच्या सुटकेसाठी महाराष्ट्राने केंद्रावर दबाव आणण्याची गरज आहे, असे मत सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार आणि सामाजिक कार्यकर्ते जतीन देसाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी कारळेंचे पुतणे नितीन कारळे उपस्थित होते.
     २८ ऑगस्ट २०१० साली बेकायदेशीररित्या पाकिस्तानात गेल्याबद्दल कारळे हे पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी २ नोव्हेंबर २०११ रोजी लाहोर वरिष्ठ न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल अद्यापही त्यांची सुटका होऊ शकलेली नाही. कारळे हे नगर जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरातील एका खाजगी फर्ममध्ये कामास होते. पण १९९७ मध्ये फर्म अचानकपणे बंद पडली आणि त्याचा परिणाम कारळेंच्या मानसिकतेवर झाला. त्यामुळे ते अनेक वर्षांपासून मानसिक रुग्ण आहेत. याच अवस्थेत ते कोणालाही न सांगता गायब झाले. ते पाकिस्तानमध्ये कैद असल्याचे कारळे कुटुंबियांना काही दिवसांनी समजले. त्यांनी राज्य सरकार, केंद्र सरकार अशा पायर्‍या झिजवूनही अद्याप त्यांची सुटका झालेली नाही. त्यांच्या सुटकेसाठी महाराष्ट्राने केंद्रावर दबाव टाकण्याची गरज आहे, अशी मागणीही कारळेंचे पुतणे नितीन कारळे यांनी पत्रकार परिषदेत केली.
    भारतीय कैदी विविध कारणांनी जवळपास ४७० व्यक्ती पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहेत. तांत्रिक कारणांमुळे शिक्षा संपूनही काही कैदी खितपत पडलेले आहेत. यामध्ये दोन्ही देशांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेला धक्का लागत आहे. पण याकडे दोन्ही देशांमधील संबंधित विभाग पुरेसे लक्ष देत नसल्याची स्थिती आहे.  कैद्यांच्या सुटकेसाठी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि अण्णा हजारे यांच्याकडे पाठपुरावाही सुरु आहे. तसेच या कैद्यांच्या सुटकेसाठी लाहोर सर्वोच्च न्यायालयात पाकिस्तानी वकील ऍड. अवेस शेख यांनी अवमान याचिका दाखल केली असून, मे महिन्याच्या मध्यापर्यंत त्यांची सुटका व्हावी, यासाठी ते प्रयत्नात आहेत. याबरोबरच महाराष्ट्रातील आमदार आणि खासदारांनी दबाव आणण्याची आवश्यकता असल्याचेही नहार यांनी सांगितले.

Leave a Comment