हैद्राबादसाठी श्री मार्कंडेय एक्सप्रेसची मागणी

सोलापूर, दि. १७ – सोलापूर – हैद्राबाद नवीन स्वतंत्र्य गाडीसाठी श्री मार्कंडेय एक्सप्रेसची मागणी पूर्व भागातील मानाचा ताता गणपती सांस्कृतिक मंडळाने मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक सुशील गायकवाड यांच्याकडे केली आहे. सोलापूर रेल्वे विभागाला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल तसेच २०११-१२ या आर्थिक वर्षात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल ताता गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने उद्योजक मल्लिकार्जुन आरकाल यांच्या हस्ते सुशील गायकवाड यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. आंध्रातून सोलापूरात दोनशे वर्षापर्वी तेलुगू भाषक मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत.
    सध्या ही संख्या सहा लाख एवढी आहे. सोलापूरहून हैद्राबादला जाण्यासाठी थेट गाडी नसल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नवीन सोलापूर- हैद्राबादला जाण्यासाठी श्री मार्कंडेय एक्सप्रेसची स्वतंत्र्य रेल्वे गाडीची व्यवस्था करावी, अशी मागणी गायकवाड यांच्याकडे केली. तसेच सोलापूर-मुंबई साठी दररोज सिध्देश्‍वर एक्सप्रेसची सोय आहे. मात्र, प्रवाशांचा ओघ मोठा असल्याने रेल्वेची सेवा कमी पडत आहे. यावर उपाय म्हणून दर शनिवारी व रविवारी सोलापूर-मुंबईसाठी विशेष गाडी सोडण्यात यावी, अशी मागणीही यावेळी मंडळातर्फे करण्यात आली.

Leave a Comment