प्रलंबीत मागण्यांसाठी प्राध्यापकांनी केले जेलभरो आंदोलन १५० प्राध्यपकांनी खाल्ली जेलची हवा

सोलापूर, दि. १७ – प्राध्यापकांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी येथील विद्यापीठासमोर घोषणाबाजी करणार्‍या प्राध्यापकांनी आपल्या मागण्या त्वरीत पूर्ण व्हाव्यात म्हणून जेलभरो आंदोलन केले. यावेळी सुटा संघटनेच्या सुमारे १५० प्राध्यापकांनी जेलची हवा खाल्ली. राज्य प्राध्यापक महासंघाच्या सूचनेनुसार प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २५ जानेवारीपासून आंदोलन पुकारण्यात आले आहे.
    विद्यापीठांवर मोर्चा, मुंबई येथे धरणे आंदोलन, विभागीय शिक्षण कार्यालयासमोर निदर्शने अशा विविध मार्गांनी आंदोलन करूनही राज्य शासनाने प्राध्यपकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यात आला. तरीदेखील शासनाने प्राध्यपकांच्या मागण्यांना केराची टोपली दाखविली होती. त्यामुळे सोमवारी प्राध्यापकांनी अखेर जेलभरो आंदोलन केले.
    नेट, सेट बाधित प्राध्यापकांच्या सेवा यु. जी. सी. च्या आदेशानुसार नियमीत करण्यात याव्यात, स्थाननिश्‍चितीचे सर्व अधिकार या प्राध्यपकांना मिळावेत व त्यासाठी महिन्याच्या आत शिबीरे आयोजित करण्यात यावीत. ६ व्या वेतन आयोगाचा फरक तातडीने देण्यात यावा.  जु. जी. सी.ची समग्र वेतन योजना लागू करावी, अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांना लागू केलेल्या ६ व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, उच्च न्यायालयाच्य आदेशानुसार १४ हजार ९४० वेतननिश्‍चीती व कुंठीत वेतनवाढीचे लाभ विनाविलंब देण्यात यावेत. १ नोव्हेंबर २००५ नंतर नेमलेल्या सर्व प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ग्रंथपाल व शा. शि. संचालकांना शिक्षकांप्रमाणेच सेवानिवृत्तीचे व ६ व्या वेतन आयोगाचे सर्व लाभ मिळावेत आदी मागण्यांसाठी जेल भरो आंदोलन करण्यात आले.  

Leave a Comment