
विजापूर, दि. १४ – कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे सरकार लवकरच गडगडणार असून, त्यानंतर होणार्या निवडणुकीमध्ये जनता दल (सेक्यूलर) पक्ष निर्विवाद बहुमत मिळवून सत्तेवर येईल, असा दावा माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यल्लाळ यांनी केला.
ते म्हणाले की, येत्या विधानसभा निवडणुकीत जनता दल पक्ष सर्व २२४ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. उत्तर कर्नाटकात आपल्या पक्षाचे किमान ४० आमदार सहजपणे आणि खात्रीने निवडून येतील. भाजपमधील काही असंतुष्ट आमदारांनीही आपल्याशी संपर्क साधला असून, योग्य वेळी हे आमदार भाजपचा त्याग करुन जेडीएसमध्ये प्रवेश करणार आहेत.
रामकृष्ण हेडगे मुख्यमंत्री असताना, राज्यातील लिंगायत समाज जेडीएस पक्षाकडे वळला होता. येत्या निवडणुकीमध्येही हा समाज आमच्या पक्षाला भरभरुन मते देईल. जेडीएसचे नेते कुमारस्वामी हेच राज्याचे भावी मुख्यमंत्री असतील. सर्वसामान्य जनतेचीही हीच इच्छा आहे. विजापूर जिल्हयातील सर्व ८ जागा आम्ही जिंकणार आहोत, मी स्वतः निवडणुकीस उभा राहणार आहे. राज्यातील जनता आता भाजपाला विटली आहे, जनतेला आता बदल हवा आहे, त्यामुळे जेडीएस हा एक उत्तम पर्याय आहे. असे त्यांनी शेवटी सांगितले.
