टंचाई स्थितीबरोबरच उपाय योजनांचा आढावा घेणार, प्रशासनाकडून ४०० कोटींच्या निधीची मागणी दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती मंगळवारी नगरमध्ये

अहमदनगर, दि. १६ – अहमदनगर जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाई व दुष्काळसदृश्य स्थितीची पाहणी करण्यासाठी डॉ. रिता पटनायक यांची एक सदस्य केंद्रीय समिती मंगळवारी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार असून, ही समिती जिल्ह्यातील भीषण पाणी टंचाईचे निरीक्षण करुन त्याबाबत प्रशासनाने केलेल्या उपाय योजनांचाही आढावा घेणार आहे. टंचाई स्थितीचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारकडून ४०० कोटींचा निधी जिल्ह्याला उपलब्ध करुन दिला जावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडून यावेळी करण्यात येणार आहे.
    गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई झाल्याने अनेक गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नगर जिल्ह्यात ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांची संख्या तब्बल १ हजार ६७ इतकी आहे. या गावांमध्ये शेती व पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना नागरिक करीत आहेत. तसेच व पाणी चार्‍याची समस्यादेखील खूपच गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करताना जनावरांसाठी पाणी व चार्‍याची समस्या प्रशासनालाही भेडसावत आहे, जिल्हा प्रशासनाकडून सध्या जिल्ह्यातील १३८ गावे व ६०२ वस्त्यांमध्ये १६८ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. मात्र, उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पाण्याच्या टँकरच्या मागणीदेखील वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या अखेरीस टँकरची संख्या ५०० जाण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पाणी उपलब्ध करुन देतांना काही टँकर जनावरांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
    मात्र, जिल्ह्यातील जनावरांच्या संख्येच्या तुलनेत ही व्यवस्था खूपच अपुरी असल्याचे दिसत आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चारा डेपो व छावण्यादेखील सुरु केल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील चार्‍याची उपलब्धता लक्षात घेता चारादेखील पूर्ण क्षमतेने उपलब्ध करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जनावरांच्या तुलनेत १० टक्के देखील चारा उपलब्ध झालेला नाही. अशा स्थितीत पशुधन जगविणे शेतकर्‍यांसमोर मोठे आव्हान आहे. नगर जिल्ह्यात निर्माण झालेल्या या भीषण टंचाई व दुष्काळी स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय समितीच्या डॉ. रिता पटनायक मंगळवारी अहमदनगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या समवेत केंद्र व राज्य सरकारचे काही वरिष्ठ अधिकारीदेखील या दौर्‍यात सहभागी होणार आहेत.