पुण्यात लष्कर हद्दीतील टेकडीला आग

पुणे, दि. १६ – पुण्यात पाषाण येथे लष्कराच्या हद्दीत असलेल्या टेकडीला रविवारी रात्री भीषण आग लागली. लष्कराच्या दारूगोळ्यापर्यंत ही आग पोहचू नये, यासाठी लष्कराला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वनसंपत्तीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अखेर तासाभरात ही आग आटोक्यात आणण्यात लष्कराला यश मिळाले.
    मिळालेल्या माहितीनुसार, पाषाण येथे लष्कराची संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास येथे अचानक आग लागली आणि बघता-बघता या आगीने रौद्ररूप धारण केले. या टेकडीपासून ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया आणि डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंटचे कार्यालय जवळ आहे. या आगीच्या तडाख्यात लष्कराचा दारूगोळा सापडू नये, यासाठी लष्कराकडून तातडीने हालचाली करण्यात आल्या. मात्र, उन्हामुळे जळालेले गवत, पालापाचोळा यामुळे या आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी टेकडीवरील वनसंपत्तीचे नुकसान झाले आहे. टेकडीवर मोर, लांडोर तसेच अनेक पक्ष्यांचा वावर असतो. या आगीत त्यांना नुकसान पोहोचल्याची भीती व्यक्त केली जात आहे