नागपूर, दि. १५ – श्री छत्रपती शिवाजी महाराजांवरील जाणता राजा व डॉ. आंबेडकरांवरील क्रांतिसूर्य यांनी शहरात महानाट्यांची परंपरा सुरू केली असून, त्यानंतर संस्थांनी महानाट्याची एक शृंखलाच तयार केली आहे. महानाट्यांच्या या सादरीकरणामुळे नागपूरचा गौरव वाढला असून महानाट्य महोत्सव आयोजित करण्याची आयोजकांची अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन महापौर प्रा. अनिल सोले यांनी दिले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा शाखा कार्यालय परिसर, लेंड्रा पार्क, रामदासपेठ येथे पार पडला. त्याप्रसंगी महापौर प्रा. सोले बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यस्थानी दत्ता मेघे वैद्यकीय विद्यापीठाचे उपकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा होते. व्यासपीठावर नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रमोद भुसारी, कार्याध्यक्ष प्रफल्ल मरकसे व प्रमुख कार्यवाह किशोर आमवार उपस्थित होते.
प्रा. सोले म्हणाले, महानरगपालिकेतर्फे अनेक योजना वर्षभर राबविल्या जाणार असून त्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास शहराचा चेहेरा-मोहोराच बदलून जाईल. याप्रसंगी महानाट्य सादर करणार्या १६ संस्थांना महापौरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. ज्येष्ठ व श्रेष्ठ रंगकर्मीचा सत्कार करण्यात आला. त्यात बाळ देशपांडे यांना ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार, देवेंद्र बेलणकर यांना श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्कार तर डॉ. माणिक वड्याळकर यांना राम गणेश गडकरी स्मृती लेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
