राज ठाकरेंची भूमिका घटनाविरोधी- जांबुवंतराव धोटे

नागपूर, दि. १५ – बिहारदिन साजरा करण्यावरून वादळ माजवणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका घटनाविरोधी असून, त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी खा. जांबुवंतराव धोटे यांनी पत्रपरिषदेत केली.
    बिहारदिन मुंबई साजरा करू देणार नाही, अशी भूमिका घेऊन ठाकरे यांनी भाषेभाषेत सवतासुभा उभा केला आहे. भारतात कोणीही कुठेही जाऊ शकतो, असे घटनेत लिहिले आहे. कुणाला येण्यापासून अडवणारे ठाकरे कोण, असा प्रश्‍न त्यांनी केला. ठाकरे यांची भूमिका समाजात घृणा पसरवणारी आहे. अशा भूमिकेमुळे महाराष्ट्राची भारतात बदनामी होत आहे. अशा प्रकारामुळे बहुभाषिक देश विनाशाकडे जात आहे. राज ठाकरे केवळ मते मिळवण्यासाठी राजकारण करीत आहेत. ठाकरेंवर माझे प्रेम असून त्यांचा मान राखतो. पण, त्यांची भूमिका कोणालाही न पटणारी आहे, असे धोटे म्हणाले. खरंतर, भाषेत आणि विचारात तेढ निर्माण करणार्‍या ठाकरेंवर शासनाने कारवाई करावी. कायदा कशासाठी आहे? कुणी जातीचे, कुणी भाषेचे, कोणी धर्माचे तर कोणी मतांचे राजकारण करतो. राजकारण्यांचा विचारांशी संबंधच राहिला नाही, अशी खंत धोटे यांनी शेवटी व्यक्त केली.

Leave a Comment