पुणे, दि. १३ – पुणे शहरातील ऐतिहासिक स्थळे आणि वारसा वस्तूंचा पुणेकरांना विसर पडत चालला आहे. याची दखल घेत पुणे वाहतूक पोलीस आणि जनवाणी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वारसादिनाचे औचित्य साधून येत्या १५ ते २२ एप्रिल हा आठवडा ‘विरासत सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच या कार्यक्रमांसाठी शनिवारवाडा, विश्रामबागवाडा यांसारखी स्थळे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या अंतर्गत ‘विरासत पुणे’ ही चळवळ सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील ऐतिहासिक वास्तूंची माहिती, त्यांचा इतिहास, सांस्कृतिक महत्व आदीविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
