एक उपचार पार पडला

    सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत फार मुरब्बी नेते राहिलेले नाहीत. भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग आणि पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी या दोघांतही भारत-पाक संबंधांना वेगळे वळण लावण्याची क्षमता नाही. आहेत तेच विचित्र संबंध आहेत तसेच जारी ठेवण्यावर त्यांचा भर आहे. मुळात नेतेच असे त्यातव झरदारी यांची भारत भेट औपचारिक मग या भेटीतून काही नवे निष्पन्न होण्याची आशा करण्यात काय अर्थ ? म्हणूनच झरदारी आले. ‘वाजा महंमद चिश्ती’च्या दर्ग्याला भेट देऊन गेले. चादर चढवली. त्यांनी या पिराकडे काही तरी मागणी केली. मग दोन देशांचे प्रमुख समोरासमोर बसून बोलले नंतर मेजवाणी झाली. भारताच्या पंतप्रधानांनी झरदारी यांनी काही खडे बोल सुनावले.  भारतात दहशतवादी कारवाया करणार्‍या पाकिस्तानातल्या हाफीज सईद याच्यासारख्या अतिरेक्यांवर पाकिस्तान सरकारने कडक कारवाई करावी,  नसता या दोन देशातले संबंध मैत्रिपूर्ण होणार नाहीत असेही पंतप्रधानांनी बजावले.  या वेळी झरदारी मनातल्या मनात हसले असतील. अशा दहशतवाद्यांना मुळात भारत सरकारच शिक्षा लवकर करीत नाही. कसाबला फाशीवर चढवत नाही. ह्यांच्या संसदेवर हल्ला करणार्‍या आरोपीला आरोप सिद्ध होऊनही सात सात वर्षे फासावर चढवण्याची हिंमत दाखवत नाही. मग आम्ही आमच्या देशातल्या या लोकांना कठोर शिक्षा कशी करणार ? जे मनमोहनसिंग परदेशी आरोपीला शिक्षा देत नाहीत ते मनमोहनसिंग पाकिस्तानला मात्र स्वदेशी आरोपींना कडक शिक्षा कराव्यात असा उपदेश करीत आहेत.आहे की नाही कमाल? अर्थात, मनमोहनसिंग यांनाही आपण कान पिळले म्हणून पाकिस्तान सुधारणार नाही हे पक्के माहीत आहे. त्यांनाही याबाबत पाकिस्तान कडून फार अपेक्षा नाहीत. पण आता आपणच झरदारींना निमंत्रण दिले आहे आणि या निमंत्रणावरून ते आपल्या देशात आले आहेत तर त्यांना काही तरी सुनावून परत पाठवले पाहिजे नसता आपलेच लोक आपल्यावर, पाकिस्तानला खडसवायची संधी गमावली म्हणून टीका करतील हे त्यांना माहीत आहे. म्हणून तोंडी का होईता कडक भाषा वापरायला काय हरकत आहे असा विचार त्यांनी केला आणि झरदारी यांना सईदला शिक्षा करण्याबाबत बजावले. गंमतीचा भाग असा की, या दोन देशांच्या बैठकीचा अजेंडासुद्धा अमेरिकेने ठरवला होता. सईदच्या डोक्यावर ऐन याच मुहूर्तावर ५१ कोटी रुपयांचे खळबळजनक इनाम जाहीर करून हे दोन राष्ट्रप्रमुख याच मुद्यावर चर्चा करतील याची व्यवस्था अमेरिकेने केली होती.  भारताने याही बाबतीत आपण स्वावलंबी नाहीत याचे दर्शन घडवत चर्चेची कक्षा तीच ठेवली. एकंदरीत भेटीची औपचारिकता संपली. झरदारी यांनी जाताना मनमोहनसिंग यांना पाक भेटीचे निमंत्रण दिले. झरदारी यांच्या सोबत आलेला बिलावल भुत्तो यानेही राहुल गांधी यांना तसेच निमंत्रण दिले. आता राहुल गांधी तिथे जाऊन काय करणार आहेत ? असो. या भेटीतून काही निष्पन्न झाले नाही, कारण त्यासाठी दोन्ही देशांतल्या नेत्यांत दूरदृष्टी हवी. घटनांना नवे वळण देण्याची धमक हवी. ती तर नाहीच पण दोन्ही नेत्यांचे आपापल्या देशातले स्थानही पक्के हवे. त्यांच्या त्यांच्या देशात त्यांच्या नेतृत्वाची विश्‍वासार्हता निर्माण झालेली असली पाहिजे. दोघांचीही तशी स्थिती नाही. दोघांचीही सरकारे भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्रस्त झालेली आहेत. झरदारी हे राष्ट्राध्यक्ष असूनही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे खटले चालवावेत असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. झरदारी यांच्या दारात कधी पोलिसांची गाडी उभी राहील आणि त्यांना अटक करून नेले जाईल याची काही शाश्‍वती नाही. असे हे अध्यक्ष. मध्येच ते एकदा परदेशी पळून गेल्याची अफवा पसरली. ते तसे काही पळून गेलेले नव्हते पण ते पळून गेले असणारच असे केवळ पाकिस्तानी जनतेलाच नव्हे तर सगळ्या जगालाच वाटले.  यातच त्यांची प्रतिमा कशी आहे याचे दर्शन घडते. इकडे मनमोहनसिंगही याबाबत आपली विश्‍वासार्हता गमावून बसले आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री एक पाय तळयात, एक पाय मळ्यात या न्यायाने मनाने तुरुंगात गेलेले आहेत. भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालणारे पंतप्रधान म्हणून ते ओळखले जायला लागले आहेत. त्यांना कोणत्या क्षणी राजीनामा देऊन राहुल गांधीसाठी खुर्ची रिकामी करावी लागेल याचा काही नेम नाही. असे हे दोन राष्ट्रप्रमुख, खाली सुरुंग पेरलेल्या खुर्च्यात बसलेले आहेत. त्यांना आपल्या पदांचीच काही खात्री नाही त्यामुळे ते भारत-पाक संबंधाबाबत फार पुढचा विचार करतील असे संभवत नाही आणि तसे घडलेलेही नाही. भारत आणि पाकिस्तानचे नेते समोरा समोर आले की, भारताने दहशतवादी संघटनांचे रडगाणे गायचे आणि त्याला उत्तर म्हणून पाकिस्तानच्या नेत्यांनी काश्मीरचे खुसपट काढायचे असे ठरलेलेच आहे. तसेच होऊन झरदारी-सिंग भेट संपली. भारताच्या निवृत्त परराष्ट्र सचिव निरुपमा राव यांनी संबंध सुधारण्याचा फार गंभीर प्रयत्न केला होता पण त्यांचाही शेवटी निरुपाय झाला. कितीही खडसावले तरी पाकिस्तानच्या वर्तनात काही बदल होणार नाही. ही काळ्या दगडावरची हिरवी रेघ आहे.