
पुणे, दि. ११ – बीपीओ आणि आयटी कंपन्यांमध्ये आधुनिकतेच्या नावाखाली अनेक प्रकारची व्यसने जडत आहेत. या व्यसनाधिनतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने मुक्तांगण, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, पुणे पोलीस आणि रोटरी क्लब हिंजवडी यांनी संयुक्तपणे जनजागृती कार्यक्रम आयोजित केला आहे. येत्या २० एप्रिल रोजी सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, खडकी येथे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती ज्येष्ठ लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बीपीओ आणि आयटी कंपन्यांमध्ये सुमारे ३ लाखापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असून यामध्ये २० ते ३० वर्षे वयोगटातील कर्मचार्यांची संख्या अधिक आहे. आयटी कंपन्यांमधील नोकरीची असुरक्षितता, कामाचा ताण, कामाच्या विचित्र वेळा यामुळे या कर्मचार्यांना जडणा-या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांमध्ये मोबाईल, इंटरनेट, हुक्का पार्टी, आयपॉड, दारू, सिगारेट, तंबाखू आदींचा समावेश असतो. या सर्व व्यसनांबाबत या कार्यक्रमात माहिती देवून जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. अनिल अवचट, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. प्रतिमा मूर्ती, सायबर सेल विभागाचे आयुक्त डॉ. संजय शिंदे आदी मार्गदर्शन करणार आहेत.
प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमात व्यसनमुक्तीचा धडा असावा
माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात तंबाखू व्यसनमुक्तीबाबतचा धडा समाविष्ट करण्याचे नुकतेच राज्य सरकारने मान्य केले आहे. मात्र, माध्यमिक वर्गात येईपर्यंत मुले स्वतःला मोठे झाल्याचे समजू लागतात. तसेच त्यांची व्यसनांबाबतची संकल्पनाही परिपक्व झालेली असते. त्यामुळे या धड्याचा समावेश प्राथमिक शालेय अभ्यासक्रमातच करणे आवश्यक असल्याचे डॉ. अवचट आणि मुक्ता पुणतांबेकर यांनी सांगितले.
