पुण्यात येत्या १४-१५ एप्रिलला ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय शिबीर

पुणे, दि. ११ – अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय शिबीर येत्या १४ आणि १५ एप्रिल रोजी पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती अ. भा. ग्राहक पंचायतीचे पुणे कार्याध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१४ एप्रिल रोजी सकाळी  ‘डॉ. स्वामी यांचे ‘हमारे देश की आर्थिक नीति भारतीय अर्थनीति नुसार है क्या?’ या विषयावर मार्गदर्शनपर भाषण होणार आहे. सायंकाळी गणेश कला क्रीडा मंच येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून भैय्यूजी महाराज यांचे ‘ शोषणमुक्त आधुनिक भारत’ या विषयावर व्याख्यान होईल. तसेच डॉ. अरुणकुमार जेटली हे ग्राहक पंचायतीच्या कार्यशैलीवर बोलणार आहेत. या सभेमध्येच ग्राहक पंचायतीच्या घटनेनुसार नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची आणि अध्यक्षांची निवड होणार आहे. १५ एप्रिल रोजी एफडीआय विषयावर नीरज जैन, राष्ट्रीय जलनीतीबद्दल संतोष गोंधळेकर आदी विचार व्यक्त करणार आहेत. या शिबिरासाठी देशभरातून सुमारे ७०० कार्यकर्ते उपस्थित राहतील, असेही पाठक यांनी सांगितले.

Leave a Comment