शरद पवारांच्या मतदार संघात दुष्काळ, मतदारांच्या अपेक्षा फोल

पंढरपूर, दि. ६ – गेल्या तीन वर्षांपासून केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी माढा मतदार संघाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मतदार संघात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मतदारांच्या अपेक्षा भंग झाला असल्याची प्रतिक्रिया मतदारांमधून व्यक्त होवू लागली आहे.
   शरद पवार शुक्रवार, ६ एप्रिलपासून सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. ते टंचाई बैठकीबरोबर पक्ष पदाधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत. गेले ४५ वर्ष शरद पवार राजकारणात असून त्यांनी बारामती लोकसभा व विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले आहे. बारामती परिसराचा विकास त्यांनी चांगल्या पध्दतीने केला. त्याच पध्दतीचा विकास पवार माढा मतदारसंघाचा करतील. या उद्देशाने मतदारांनीही पवार यांना भरघोस मतांनी विजयी केले. परंतु गेल्या तीन वर्षात माढा लोकसभा मतदार संघाचा विकास म्हणावा तसा झाला नाही. त्यामुळे मतदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. निवडणुकीपूर्वी पवार यांनी मतदार संघातील पाणी, रस्ते, विजेचा प्रश्न प्राधान्याने सोडवू, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता झाली नाही. वर्षानुवर्षे सांगोला, माण, खटाव, माळशिरस हे तालुके टंचाईग्रस्त आहेत. काही ठिकाणी बारमाही पाण्याचे पाट वाहत आहेत. मात्र काही ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तर जनावरांना चार्‍यांसाठी वणवण करावी लागत आहे.
   पवार यांनी तीन वर्षात अकलुज, भीमा नगर, करमाळा, शेळवे येथे ५ ते ६ वेळा अधिकार्‍यासमवेत माढा मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासंदर्भात बैठका घेतल्या. मात्र कोणतेही काम झाले नाही. या मतदार संघात कायमचा दुष्काळ आहे. पुढील २ वर्षात तरी पवारांनी मतदार संघात लक्ष घालून वीज, पाणी, रस्ते याचा प्रश्न सोडवावा व माढा लोकसभा मतदार संघात बारामती पॅटर्न वापर करावा अशी मागणी मतदारांतून होत आहे.
    पवारांच्या निर्णयाकडे लक्ष…
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचे मतभेद चव्हाट्यावर येवू लागले आहेत. पुलाखालून बरेच पाणी गेल्यामुळे अनेक मताब्बरांना झटका बसला आहे. जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती गट तयार करून लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे अंतर्गत राजकारण ढवळून निघाले असून राजकारणाला कलाटणी मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विजयसिंह मोहिते-पाटील घराण्याकडे गेल्या ३० वर्षात मंत्री, खासदार, आमदार अशी पदे होती. तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँकेवर मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व होते. सध्या मोहिते-पाटील गटाकडे एकही राजकीय पद नसल्यामुळे मोहिते-पाटील गट नाराज आहे. मोहिते-पाटीलांचे पुनर्वसन करण्यासाठी शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment