कलानगर जंक्शनजवळ बेस्टची दुमजली बस उलटली; एक ठार; २६ प्रवासी जखमी

मुंबई, दि. ६ – बेस्ट उपक्रमाची दुमजली बस वांद्रे कलानगर ‘मातोश्री’ समोरील जंक्शन येथे आज सायंकाळी बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे अचानक उलटली. या विचित्र अपघातात एक मोटरसायकलस्वार ठार झाला. तर २६ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या अपघातानंतर बस चालक स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान, बेस्ट समितीचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची माहिती घेतली. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश बेस्ट प्रशासनाला दिले आहेत.
पाटील यांनी दिलेल्या व प्राप्त माहितीनुसार आज सायंकाळी ४.१० वाजता बेस्ट उपक्रमाची ३१० क्रमांकाची ही दुमजली बस प्रवाशांना घेऊन वांद्रे स्टेशन येथून कुर्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी कलानगर जंक्शन येथे सिग्नलला उभी होती. बस चालकाने घाईगडबडीत बस वळवण्याचा प्रयत्न केला असता बस उलटली. या विचित्र अपघातात एक मोटरसायकलस्वार ठार झाला. मृत दुचाकी चालकाचे नाव समजू शकलेले नाही. या घटनेनंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी बेस्ट अधिकार्‍यांनी चौकशीला सुरुवात केली. मात्र, जखमींची व बसचालकाचेही नाव समजू शकले नाही.

Leave a Comment