बिबट्याचा हल्लाबोल, चार जखमी

वाशीम, दि. ४ – पुलाखाली दाबा धरून बसलेला बिबट्या त्याला पाहायला जमलेली गर्दी बिबट्याचा नागरिकांवर हल्लाबोल त्यात जखमी झालेले चारजण असा थरार मंगळवारी तालुक्यातील भोयणी फाट्यावर अनुभवायला मिळाला. कारंजा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत मानोरा तालुक्यातील भोयणी फाटा येथे वसंतराव नाईक विद्यालयाजवळ बिबट्या आढळला. या बिबट्याने वनकर्मचारी जी.एस.थेर, शेतमजूर भाऊराव राठोड, इंझोरी येथील गणेश मधुकर आरेकर यांच्यावर हल्ला करून जखमी केले.
  मानोरा ते कारंजा रस्त्यावर भोयणी फाटा येथील वसंतराव नाईक विद्यालयासमोर असलेल्या पुलाच्या पाइपमध्ये हा बिबट्या दबा धरून बसला होता. परिसरात वार्ता पसरताच बघ्यांची एकच गर्दी झाली. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्या मोहगव्हाण गावाकडून आला आणि रस्ता ओलांडून वसंतराव नाईक विद्यालयाच्या प्रांगणात शिरला. त्याला पाहायला लोक इमारतीवर चढले असता तेथे त्याने एकाला जखमी केले. भोयणी येथे विहीरीवर पाणी भरत असलेल्या महिलांना समोरून बिबट्या येताना दिसला.
  पाण्याचे भांडे तेथेच टाकून त्या भीतीने घरात दडल्या. बिबट्याने तेथे पाणी प्यायले, परंतु लोकांची गर्दी पाहून आल्यापावली परत फिरला. शेतामध्ये गणेश आरेकर यांच्यावर हल्ला करून जखमी केले. पुन्हा तो पुलाखाली दडून बसला. वनाधिकारी व कर्मचारी, कारंजाचे कविटकर, देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी किरण धोटे, तहसीलदार नामदेव टिळेकर, ठाणेदार अरविद तायडे, मंगरूळपीरचे यांच्यासह अन्य बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. अखेर बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद करून कारंजाकडे रवाना केले.