बलवंतसिंगच्या फाशीबद्दल पंजाब बंद

चंदीगड, दि. २८  – बलवंतसिंग राजोनाला फाशी देण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी अनेक शीख संघटनांनी बुधवारी पंजाबमध्ये बंद पुकारला. बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअंतसिंग यांच्या हत्येप्रकरणी बलवंतसिंगला फाशीची शिक्षा ठोठावली गेली आहे.
  शीख संघटनांनी पुकारलेल्या या बंदला पटियाला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बलवंतसिंग राजोना येथील स्थानिक मध्यवर्ती तुरूंगात आहे. मार्च ३१ रोजी त्याला फाशी देण्याचे आदेश चंदीगड सत्र न्यायालयाने दिले आहेत. लुधियानामध्ये परिस्थिती नियंत्रणात होती. उपहारगृहे चालू होती तर काही व्यापारी संकुलेही सुरु होती.
  दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राजोनाला ठेवण्यात आलेल्या तुरूंगाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच, आंदोलकांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापित केले आहेत. एकंदर राज्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, चंदीगडमध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
 बिअंतसिंग हत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने १ ऑगस्ट, २००७ रोजी राजोना आणि जगतारसिंग हवारा यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. चंदिगड न्यायालयाने पटियाला जेल अधिकार्‍यांना मृत्यूपत्र जारी केले होते. ज्यानुसार दोन्ही आरोपींना ३१ मार्च रोजी फाशी देण्यास सांगितले गेले होते.