निषेधार्ह हिंसाचार

गडचिरोली जिल्ह्यात एका वर्षाच्या खंडानंतर नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाले असून त्यांनी काल विशेष पोलीस दलाच्या मिनीबसवर हल्ला करून १२ जवानांचे प्राण घेतले आहेत. गेल्या तीन वर्षात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये एकट्या गडचिरोली जिल्ह्यात काही सामान्य नागरिकांसह ८५ जवान मृत्युमुखी पडले आहेत. महाराष्ट्र शासनाला गडचिरोली जिल्ह्यातल्या या नक्षलवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात अपयश आलेले आहे. पोलीस आणि सरकार अधूनमधून नक्षलवादी संपले आहेत आणि लवकरच त्यांचे बंड संपुष्टात येईल, असे दावे करत असते. परंतु प्रत्यक्षात नक्षलवादी आणि माओवादी संपत तर नाहीतच पण उलट त्यांचा प्रभाव वाढत चालला आहे. गेल्या वर्षी नक्षलवादी नेता श्री. किशनजी याची हत्या झाली. त्यापूर्वी अशाच मोठ्या नेत्याला मारण्यात आले. या हत्या झाल्यानंतर पोलिसांनी अनेक नवे सिद्धांत मांडले. या मोठ्या नेत्यांना मारण्यात आले असल्यामुळे माओवादी संघटनांचे कंबरडे मोडले आहे आणि आता या संघटना संपत आल्या आहेत असे या पोलिसांनी सांगितले. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. किशनजीच्या हत्येनंतर याच लोकांनी गडचिरोली जिल्हयात  काही ग्रामपंचायत कार्यालये जाळली.  आता ओरिसात त्यांनी दोघा पर्यटकांना आणि आमदाराला पळवून नेले. माओवादी संपले असल्याचा दावा खोटा आहे. कारण त्यांनी सत्ताधारी आमदाराला अपहृत केले आहे. गेल्या काही वर्षात माओवादी संघटनांच्या विरोधात केवळ आंध्र प्रदेशात काही प्रमाणात प्रभावी कार्यवाही झाली आहे. तिथे राजकीय अस्थिरता असतानाही नक्षलवादी संघटनांच्या कारवाया कमी झाल्या आहेत. आंध्र प्रदेश सरकारने संघटित केलेल्या ग्रे हाऊंड या नव्या दलामुळे ही किमया तिथे घडली आहे. आंध्रात नक्षलवादी हिंसाचारात मारले  गेलेल्या लोकांची संख्या घटली आहे. आता ही घटती संख्या किती काळ अशीच राहणार, आता हे यश वाटत असले तरीही ती वादळापूर्वीची शांतता तर नाही ना असे अनेक प्रश्न निर्माण होतात पण निदान आता तरी त्याला यश म्हणायला काही हरकत नाही. अन्य राज्यात एवढेही काही घडलेले नाही. ओरिसात तर स्थिती गंभीरच होत चालली आहे. राज्य कोणतेही असो या संघटनांचा प्रभाव कमी करण्याचा मूलगामी इलाज योजिला जात नाही तोर्यंत त्यांचा कायमचा बंदोबस्त होणार नाही. खरे तर त्यांच्या बाबतीत बंदोबस्त हा शब्दही चुकीचा आहे. प्रचंड प्रमाणात पोलीस बळ कामाला लावून माओवादी समर्थकांचे मोठ्या प्रमाणावर मुडदे पाडल्याने हा बंदोबस्त होणार आहे का? तसा तो होणार नाही. या संघटना आदिवासी समाजात वाढतात आणि या समाजात मोठे दारिद्र्य आहे. नक्षलवादी किंवा माओवादी संघटनांचा बंदोबस्त करायचा असेल तर या दारिद्र्याचा बंदोबस्त केला पाहिजे. तो करण्यात यश येत नाही तोपर्यंत या संघटनांचा प्रभाव कमी होणार नाही.त्यांना वरचेवर तरुणांची कुमक मिळत राहणार आहे. आपल्याला मुक्त अर्थव्यवस्थेचे लाभ या समाजापर्यंत पोचवता येत नाहीत. त्यांना गरिबीतून मुक्त करता येत नाही हे आपले अपयश आहे. त्याचा आपण कधी विचार करायला तयार नाही. आपल्या देशातल्या कित्येक लोकांना आदिवासी हे कसे असतात आणि कसे राहतात याची जराशीही कल्पना नाही. महाराष्ट्रात यवतमाळ, गदिया, भंडारा, गडचिरोली  या जिल्हयात नक्षलवाद्यांचा उपद्रव आहे असे मानले जात होते पण आता त्यांची व्याप्ती वाढत चालली आहे. दोनच दिवसांपूर्वी पुण्यात श्रमिक पत्रकार संघटनेच्या कार्यालयावर नक्षलवादी संघटनेची पत्रके झळकली. गल्या वर्षभरात नाशिक, ठाणे, पुणे या जिल्ह्यांमध्ये शहरी भागात काही तरुण आणि तरुणींना नक्षलवादी असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली. हे सगळे तरुण गोंदिया, भंडारा या जिल्ह्यातले होते आणि उच्च शिक्षित होते. मुंबई आणि पुण्यातल्या विविध औद्योगिक प्रकल्पांमध्ये आणि खाजगी कारखान्यांमध्ये नोकर्‍या धरून तिथल्या आपल्या सहकार्‍यांना नक्षलवादाची दीक्षा देण्याचा त्यांचा विचार होता. त्यांच्या चळवळीच्या म्होरक्यांनी त्यांना तशा टिप्स् दिल्या होत्या, असे त्यांनी कबूल केले आहे. या संघटनांनी गेल्या वर्षी ओरिसाच्या मलकनगिरी जिल्हयाचा जिल्हाधिकारी व्ही. कृष्णा याला पळवून नेले होते आणि काही दिवस त्याला आपल्या कब्जात ठेवून सोडून दिले. ओरिसातल्या माओवादी संघटनांनी आपल्या ताब्यातला प्रदेश मुक्त प्रदेश म्हणून घोषित केला आहे आणि  त्या प्रदेशात कोणी फिरकता कामा नये असा फतवा जारी केला आहे. या जिल्हाधिकार्‍यांनी या प्रदेशात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्यालाच पळवून नेण्यात आले. तिथली स्थिती अशी असेल तर अन्य सरकारी कर्मचारी तिकडे कसे काय फिरत असतील आणि तिथे सरकार नावाची यंत्रणा कशी काम करीत असेल याचा अंदाजही करता येत नाही इतकी ही स्थिती वाईट आहे. छत्तीडगडचा तर पाच हजार चौ.कि.मी.चा एक जंगली भाग असा आहे की, ज्या भागात गेल्या ६० वर्षात साधा तलाठी सुद्धा कधी जाऊ शकलेला नाही. जर प्रशासनाची ही अवस्था असेल तर आपल्या देशाला महाशक्ती बनविण्याच्या गप्पा मारण्यात कसा काहीच अर्थ नाही हे लक्षात यायला लागते.

Leave a Comment