
लखनौ, दि.१५ मार्च- समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी गुरुवारी उत्तरप्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली. अखिलेश हे उत्तर प्रदेशाच्या इतिहासातीस सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. उत्तरप्रदेशाचे राज्यपाल बी. एल. जोशी यांनी अखिलेशला पदाची व गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्या शपथविधीला पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिह बादल, उद्योगपती अनिल अंबानी, अभिनेत्री जया बच्चन यांच्यासह इतर राजकीय नेते उपस्थित होते. अखिलेश यांच्यासोबत इतर २९ आमदारांनी यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. यांच्यात राजाभैया यांनाही अखिलेशने आपल्या मंत्रीमंडळात सहभागी केले. हा सोहळा लखनौतील मार्टिनीयर मैदानावर पार पडला. या कार्यक्रमाला सुमारे २५ हजार लोकांनी उपस्थिती दर्शविली. या समारंभासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
