युपीएकडे पुरेसे संख्याबळ – पंतप्रधानांचा दावा

नवी दिल्ली, दि. १२ – अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसंदेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी संयुक्त राष्ट्रीय पुरोगामी आघाडीकडे कामकाजादरम्यान विरोधकांचा दबाव योग्य प्रकारे हाताळण्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा विश्वास पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग  यांनी सोमवारी व्यक्त केला. 
 संसंदीय सत्रात विरोधी पक्षाने सरकारवर दबाव टाकणे हा कामकाजाचा एक भाग आहे. आम्ही विविध प्रश्नांवर चर्चा करुन ते योग्यप्रकारे सोडविण्याचे प्रयत्न करु. देशासमोर असलेले प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला सहकार्य करुन एकत्र काम करावे, अशी माझी सर्व पक्षांना विनंती आहे. तसेच सरकार टिकविण्यासाठी पुरेसे संख्याबळ आमच्याकडे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले.
नुकत्याच पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकींमध्ये काँग्रेस पक्षाला कठीण वेळेला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे सरकारला अर्थसंकल्पीय सत्रात काहीशी ओढाताण सहन करावी लागू शकते. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसवर आपल्या मित्र पक्षांकडून टीका होत आहे. संयुक्त  पुरोगामी आघाडीतील तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष ममता बॅनर्जींनी खत सबसिडीत कपात व पेट्रोलच्या वाढत्या किमंतीमुळे काँग्रेसवर टीका केली होती. तसेच त्यांनी राष्ट्रीय दहशतवादी केंद्राच्या (एनसीटीसी) स्थापनेलाही विरोध दर्शविला आहे.
 या अधिवेशनात लोकपाल आणि शिक्षणाचा अधिकार ही विधेयके मंजूर होण्याची शक्यता केंद्र सरकारने वर्तविली आहे. मात्र एनसीटीसी, रिटेल क्षेत्रात एफडीआय, इस्त्रो करार आणि मच्छिमारांवर वारंवार होणारे हल्ले व हत्येप्रकरणी विरोधी पक्ष सरकारला घेरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment