नेतृत्वाची कसोटी

शेवटी  नेतृत्व म्हणजे तरी काय ? ज्याला समाज मनाची नाडी कळते, ती ओळखून तो समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे सरसावतो तोच खरा नेता. यातले समाजाच्या नाडीवर बोट फार महत्त्वाचे आहे. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत अशा सगळ्याच नेत्यांच्या कौशल्याची परीक्षा झाली. आपल्याला २० कोटी मतदारांचा कौल मागायचा आहे, त्यांचे नेतृत्व करण्याची संधी मागायची आहे, त्यांचे भवितव्य ठरवण्याची क्षमता सत्तेत असते आणि आपण त्यांच्याकडे ती सत्ता मागणार आहोत. अशा वेळी लोक आपल्या भवितव्याची मदार आपल्या हातात सोपवताना काही प्रमाणात विचार करणारच. ते काही कोणाही लुंग्यासग्याला आपला नेता करणार नाहीत. तेव्हा आपण त्यांच्यासमोर जाताना चुकीच्या पद्धतीने जाता कामा नये हे ज्यांना कळले ते निवडून आले. समाजासमोर जाताना ज्यांनी चुका केल्या त्यांना लोकांनी नाकारले. जो अचुक भूमिका घेतो तोच खरा नेता. अशा भूमिका घेताना, इंग्रजीत ज्याला नो नॉनसेन्स अॅप्रोच असे म्हणतात तो अॅप्रोच असला पाहिजे.  मुलायमसिग यादव आणि अखिलेश यादव यांनी असा अॅप्रोच ठेवला असे आता दिसायला लागले आहे.बाकीच्यांनी तसा विचार केला नाही. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात लोकांना काही तरी विसंगती दिसून आली. निवडणुकीत भावनेचे मुद्दे पणाला लागतात तेव्हा अशा छोट्या मोठ्या प्रमादांकडे लोकांचे दुर्लक्ष होते आणि नेत्यांचे असे प्रमाद भावनेच्या लाटेत वाहून जातात. पण निवडणूक सामान्य वातावरणात होते तेव्हा लहान सहान सार्याव चुका आणि विसंगतींची चिकित्सा होते. त्यातल्या त्यात निवडणुकीची प्रक्रिया फार दीर्घ  असल्यास अशा विसंगतींची फार चर्चा होते. राहुल गांधी यांचेच उदाहरण घ्या. त्यांनी उत्तर प्रदेशात आपली सारी शक्ती पणाला लावली होती. त्यांनी राज्यात २०० सभा घेतल्या. खरे तर दोन महिन्यांच्या काळात २०० सभा म्हणजे काहीच नाही. कारण त्यांच्या आजीने १९८० साली रोज २०-२० सभा घेऊन सारा देश पिजून काढला होता. पण राहुल गांधींच्या २०० सभांचा फार गवगवा करण्यात आला. त्यांनी उत्तर प्रदेशावर आपले लक्ष केन्द्रित केले होते पण त्यामुळे जनतेने त्यांच्यावर लक्ष केन्द्रित करावे असे काही नाही. राहुल गांधी आपले कल्याण करतील अशी त्यांना आशा वाटली पाहिजे. राहुल गांधी उत्तर प्रदेशाचे कल्याण करायला निघाले होते पण ते त्यासाठी उत्तर प्रदेशातच राहणार होते का ? ती गोष्ट त्यांनी मोठ्या हुशारीने अध्याहृत ठेवली. आपण निवडून आल्यावर उत्तर प्रदेशाच्या राजकारणाला वाहून घेऊ आणि राष्ट्रीय  राजकारणाशी आपला काही संबंध असणार नाही असे त्यांनी म्हणायला हवे होते. तर उ.प्र.ची जनता त्यांच्या मागे उभी राहिली असती. 

आपली वाटचाल आणि उत्तर प्रदेश यांच्या बाबतीत काही गोष्टी अस्पष्ट ठेवल्या तरी चालतात. असे त्यांना वाटले पण जनतेच्या मनात या विषयी संशय निर्माण झालाच होता. राहुल गांधी जनतेला वेडी समजतात पण जनता वेडी नाही.आपण उत्तर प्रदेशातल्या जनतेला वेगवान प्रगती करणारे सरकार देण्याचा वायदा करीत आहोत पण यावर जनता विश्वास का ठेवेल, यावर त्यांनी काही विचारच केला नाही. देशात आज गुजरातच्या प्रशासनाचे आणि विकासाचे फार कौतुक होत आहे. असे एखादे काँग्रेसच्या हातातले राज्य आहे का की ज्याकडे बघून उत्तर प्रदेशाच्या जनतेला, काँग्रेस चांगले सरकार देईल असा विश्वास वाटावा ? राहुल गांधी यांना तसे एकही राज्य सरकार दाखवता आले नाही. जनतेला तसे दाखवण्याची गरज नाही, असे त्यांना वाटले. आपल्या घराण्याविषयी आणि आपल्या तरुण पणाविषयी जनतेच्या मनात आकर्षण आहे आपण इतर पक्षांतल्या नेत्यांची वये सांगून आपल्या तारुण्याचा डिडिम वाजवला की लोक आपल्याकडे आकृष्ट होतील असे त्यांना वाटले पण, राहुल गांधी तरुण आहेत एवढयाच एका गोष्टीवर विश्वासून लोक त्यांना मते द्यायला तयार झाले नाहीत. लोक या गोष्टीवरून आपल्याला मते देतील असे त्यांना वाटले कारण त्यांचे जनतेच्या नाडीवर बोट नाही.

भारतीय जनता पार्टीने भ्रष्टाचार हा निवडणुकीतला मुद्दा केला होता. पण भ्रष्टाचाराचे आरोप असणार्याा बाबूसिंह कुशवाह यांना त्यांनी पक्षात घेतले. या बाबत नो नॉनसेन्स अॅप्रोच घेणे त्यांना जमले नाही.  उत्तर प्रदेशात गाजत असलेल्या या अब्जावधीच्या घोटाळ्यातला आरोपी पक्षात घेतला तर जनतेला काय वाटेल याचा विचार भाजपा नेत्यांना करता आला नाही.   काहीही केले तरी जनतेला काही समजत नाही या भ्रमात ते वाहात गेले. मायावती यांनीही व्यक्तिस्तोमाची मर्यादा ओलांडली. बसपा म्हणजे मायावती आणि मायावती म्हणजे बसपा हे समीकरण घट्ट करताना त्यांनी अजागळ  व्यक्तिस्तोम माजवले. याची लोकांना किळस येत आहे याची जाणीव त्यांना राहिली नाही. भ्रष्टाचाराच्या बाबतीत  कोणाचेच वर्तन निर्दोष नव्हते. राजकीय युक्त्या करून  निवडणूक जिंकता येत नाही.लोकांना भूलथापा देऊन निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला तर लोकांना तो आपला अपमान वाटतो. लोकांना गृहित धरणारांना तर जनता फारच वाईट रीतीने फेकून देत असते. तेव्हा नेत्यांना निवडून यायचे असेल तर जनतेला फसवण्याच्या भानगडीत न पडता तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या निवडणुकीचा हा धडा आहे.

 

Leave a Comment