सपाच्या सायकलच्या ठोकरीने बसपाचा हत्ती गारद

 लखनौ, दि. ०६ मार्च – देशातील सर्वात मोठे आणि राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचे राज्य असा लौकिक असणार्या६ उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या ४०३ पैकी २२५ जागांवर विजय संपादन करून समाजवादी पक्ष (सपा) पुन्हा एकदा सत्तेत परतला आहे. सपाने मावळत्या मुख्यमंत्री मायावतींच्या बहुजन समाजवादी पक्षाला अक्षरशः चारीमुंड्या चीत केले. सत्तास्थापनेसाठी जनतेचा कौल मिळाल्यानंतर समाजवादी पक्षातर्फे राज्याचे मुख्यमंत्री व पक्षाचे सभागृह नेते म्हणून पक्षाध्यक्ष मुलायमसिह यादव यांचे नाव जाहीर केले आहे.

एकहाती बहुमत मिळवित २००७ साली सत्तेत आलेल्या मायावतींच्या हत्तीला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र केवळ ७६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या अनपेक्षित निकालामुळे सपाच्या गोटात आनंदाचे उधाण आले असले, तरी लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागलेल्या बसपा आणि काँग्रेस मुख्यालयात मात्र मंगळवारी स्मशानशांतता पसरली होती. काँग्रेसला अवघ्या २७ जागा जिकता आल्या. तर ४९ जागा जिकणार्याय भाजपाच्या गोटात आपल्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

या निवडणुकीतील काही लढतींकडे अनेकांचे लक्ष लागले होते. सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस यांचा या लढतीत पराभव झाला. खुर्शीद यांनी निवडणूक आयोगावर शेरेबाजी करून, स्वतःलाच टीकेचे धनी बनवून घेतले खरे. पण त्यांना आपल्या पत्नीलाही निवडून आणणे शक्य झाले नाही. भाजपाच्या उमा भारती यांनी चरखारी मतदारसंघातून निवडून येण्यात यश मिळविले असले तरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सूर्यप्रताप साही यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला. खुद्द सोनिया गांधी यांचा रायबरेली मतदारसंघ आणि राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघ वाचविण्यात काँग्रेसला आलेले अपयश लाजीरवाणेच म्हणावे लागेल. 

उत्तर प्रदेशमध्ये देशातील सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ असल्यामुळे, येथील विधानसभेची निवडणूक देखील देशाच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी असते. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची गेल्या काही काळातील खालावलेली कामगिरी, संपुआ मधील घटकपक्षांमध्ये निर्माण झालेला बेबनाव यामुळे आपली प्रतिमा उजळविण्याकरिता काँग्रेसची मदार उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर होती. उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळविता आली नाही तरी, आपल्या मदतीशिवाय कोणत्याही पक्षाला सरकार बनविता येणारच नाही, असे आडाखे बांधून, काँग्रेसने प्रचाराची रणनिती ठरविली होती. त्यादृष्टीने काँग्रेसची पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील प्रचाराची धुरा सांभाळताना अल्पसंख्य आणि आर्थिक सामाजिक दृष्टीने मागासवर्गीयांवर आश्वासनांची खैरात केली होती. २००७ साली २२ जागा जिकणार्यास काँग्रेसला यंदा कारिश्मा करण्याचा ठाम विश्वास होता. प्रत्यक्षात मात्र त्यांना २७ जागाच जिकण्यात यश मिळाले. 

भ्रष्ट केंद्र सरकार, काँग्रेसने मुस्लिम समाजाचा केलेला विश्वासघात, निवडणूक प्रचारकाळात केंद्रीय कायदेमंत्री सलमान खुर्शीद, राहुल गांधी यांच्या मर्जीतील ज्येष्ठ नेते बेनीप्रसाद वर्मा आणि दिग्विजय सिह यांनी केलेली बेछूट व्यक्तव्ये आणि फाजील आत्मविश्वास हीच काँग्रेसच्या पराभवाची मुख्य कारणे ठरली. उत्तर प्रदेशमधील ही निवडणूक म्हणजे जपानी सुमो कुस्तीताच आविष्कार ठरला. यात पराभूत हणार्या  मल्लाचे वजनच त्याच्या पराभवाचे कारण ठरते.  

उत्तर प्रदेशच्या इतिहासात सलग पाच वर्षे एकच मुख्यमंत्री सत्तेवर राहण्याचा विक्रम नोंदविला तो बहुजन समाजवादी पक्षाने. मायावती यांनी २००७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोशल इंजिनियरींगचा वापर करीत एकहाती २०६ जागा जिकल्या होत्या. याच बळावर जरी त्यांनी पाच वर्षे सत्ता उपभोगली असली तरी सरकारी खर्चाने राज्यभर स्वतःचेच पुतळे उभारणे, भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालणे, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्याच मानसिकतेने अन्य पक्षांवर टीका करणे आदी कारणांमुळे मायावती यांनी अवघ्या पाच वर्षात उत्तर प्रदेशमध्ये केलेली विकासाभिमुख कामे दुर्लक्षित झाली. मायावती यांच्या राजवटीत उत्तर प्रदेशची प्रशासकीय आणि आर्थिक स्थिती सुधारली खरी. परंतु, या कामाचे श्रेय निवडणूक निकालात परिवर्तीत करण्यात मायावती कमी पडल्या. परिणामी २००७ साली २०६ जागा जिकणार्याम मायावतींना यंदा केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले.

भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशच्या राजकारणात दुसरा पर्यायी विरोधी पक्ष म्हणून आपले स्थान कायम राखले असले तरी २००७ सालच्या तुलनेत त्यांना आपल्या २ जागा गमवाव्या लागल्या आहेत. उमा भारतींसारख्या आक्रमक नेत्यांच्या हाती प्रचाराची धुरा सोपविल्यामुळे भाजपाकडून राजकीय निरीक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. माजी पक्षाध्यक्ष राजनाथ सिह, ज्येष्ठ नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी आणि स्वतः पक्षाध्यक्ष नितीन गडकरी हे सर्व नेते या प्रचारात उतरले होते. पण त्याचा परिणाम मतपेटीवर झालेला दिसत नाही. कदाचित प्रचारात ठोस मुद्यांचा आणि सातत्याचा अभाव हे त्याचे एक कारण असावे.          

समाजवादी पक्षाला एकूणच राजकीय मरगळ आली असतानाच मिळालेला हा विजय पक्षनेत्यांचे मनोधैर्य कमालीचे उंचावणारा ठरला आहे. अमर सिह यांच्यासारख्या उपद्रवमूल्य असणार्‍या नेत्याची पक्षातून केलेली हकालपट्टी, सरंजामी नेत्यांना बाजुला करून अखिलेश यादव सारख्या युवा नेतृत्वाला जनतेसमोर आणणे, राज्यातील जनतेच्या नेमक्या गरजा ओळखून, त्या पूर्ण करण्याचे प्रचारकाळात दिलेले आश्वासन व मुस्लिम समाजाने केलेले एकगठ्ठा मतदान या समाजवादी पक्षाच्या विजयातील जमेच्या बाजू ठरल्या. २००७ साली ९७ जागा जिकून प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावणार्याल समाजवादी पक्षाला आता दिलेली आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण करण्याचे शिवधनुष्य पेलावे लागेल.

Leave a Comment