मराठीतील वैश्विकता आणि आत्मग्रस्तता

दूरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, अशी विश्वाच्या कल्याणाची आळवणी करणाऱ्या मराठी भाषेतील साहित्याभोवती प्रादेशिकता, जातीयता आणि नुसतीच व्यक्तीगतता यांची कुंपणे कधी उभी राहिली? की या तुकडयांच्या अहंताच स्वधर्म सूर्ये म्हणून बलशाली झाल्या? यातले वास्तव मराठीच्या सूर्योदयाच्या काळातले की तिच्या मावळतीची चिंता करू लागलेल्या आताच्या काळातले? नव्या जमिनी अधिक सकस असतात, त्या धुपल्या की त्यात तणाखेरीज फारसे काही उगवत नाही असे म्हटले जाते. मात्र तणांनाच भाले मानण्याची प्रवृत्ती बलशाली होत असेल तर… किंवा पूर्वी फारसे काही पिकलेच नाही असे कुणी म्हणणार असेल तर.? 

मराठी ही जगातली पंधराव्या क्रमांकावर असलेली दहा कोटी माणसांची मातृभाषा आहे. जर्मन, फ्रेंच आणि जपानी भाषेच्या ती जवळ जाणारी आहे. इटालियन, मेक्सिकन व अरबी भाषांहून जास्त बोलली जाणारी आहे. तिला एक हजार वर्षांचा इतिहास आहे. तिने मोगलांचे आक्रमण सोसले आणि ब्रिटिशांचे दडपणही सहन केले आहे. एवढयावरही ती टिकली आणि जगली असेल तर आताच्या स्वातंत्र्यात ती खंगेल आणि संपेल असे म्हणणारी माणसे गडकऱ्यांच्या चिंतातुरांहून वेगळी नाहीत हे नम्रपणे सांगावे लागेल. ‘मराठी उतरणीला लागली’ ही भाषा मराठी भाषिकांची नाही.

साहित्य संमेलन नावाच्या उत्सवाला जमणाऱ्यांची व त्यात भाषणे करणाऱ्यांची ती बोली आहे. (मुंबई सोडावी लागलेल्या आणि आता पुण्याच्याही अनेक भागांतून हलू लागलेल्या मराठी माणसांच्या मनातली ही भीती आहे काय? विदर्भ हा एकेकाळी मध्यप्रांताचा भाग होता. मराठवाडयावर परवापर्यंत निजामाचे आसफशाही राज्य होते, मध्यप्रांताची भाषा हिंदी तर निजामशाहीत उर्दूचा वरचष्मा होता. तरीही त्या दोन भागात मराठीची चिंता करताना कोणी दिसत नाही. तो त्या प्रदेशातील लोकांचा मराठीविषयीचा भरवसा मानायचा की त्यांच्यावर संवेदनशून्यतेचा वा माघारलेपणाचा ठपका ठेवून मोकळे व्हायचे?)

भाषेतले साहित्य वा ती बोलणाऱ्यांची संख्या यावर तिचे मोठेपण वा भवितव्य ठरत नाही. त्या भाषेतून प्रगटणाऱ्या ज्ञानाच्या बळावर तिचे महात्म्य ठरत असते. संस्कृत ही भाषा आज लोप पावलेली दिसत असली तरी तिचे अध्ययन करणारे व तिच्या ग्रंथांमधील ज्ञानाचा ठाव घेणारे असंख्य लोक जगात आहेत. इंग्लंड व जर्मनीतल्या किती तत्त्वचिंतकांनी त्या भाषेच्या अध्ययनावर आपली उंची वाढवून घेतली हे येथे आठवण्याजोगे आहे. भाषा हा समाजाच्या अनुभवाचा हुंकार असतो. तो अनुभव जेवढा सकस आणि समृध्द व त्याची अभिव्यक्ती जेवढी दमदार आणि समर्थ तेवढी ती भाषाही मोठी, उंच आणि अधिक व्यापक क्षेत्र कवेत घेणारी होते. 

मराठी भाषेएवढाच तिच्या साहित्याचा इतिहास मोठा आहे. तो घडविण्यात महाराष्ट्रातील सर्व जाती, पंथ व धर्मांतील संतांपासून शाहिरांपर्यंतच्या, बखरकारांपासून विचारवंतांपर्यंतच्या आणि राजकारणाएवढेच समाजकारणाचे नेतृत्त्व करणाऱ्यांच्या कर्तृत्त्वाचा वाटा मोठा आहे. असे साहित्य नंतरच्या काळात चौरस होत न जाता एकारलेले होत गेले असेल आणि ‘सारे काही वाचा’ इथपासून ‘त्यांचे वाचू नका’ असे सांगण्यापर्यंत पुढे वा मागे गेले असेल तर त्याची कारणे भाषेच्या बलाबलात शोधायची नसून समाजाच्या कमीअधिक झालेल्या उंचीत शोधायची असतात…

वास्तविक शिक्षणाच्या प्रसारामुळे वाचकांची संख्या वाढली. गाव तेथे ग्रंथालय उभे झाले, लेखकांची संख्या वाढली, प्रकाशकांचा धंदा वाढला.. महाराष्ट्र हे इंग्रजी ज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा सर्वाधिक स्वीकार करणारे राज्य असले तरी या राज्यात मराठी वृत्तपत्रांना मिळविता आली तेवढी वाचकसंख्या इंग्रजी वृत्तपत्रांना मिळविणे जमले नाही. देशातही सर्वाधिक खप असलेली पहिली दहा वृत्तपत्रे ‘राष्ट्रीय’च आहेत. मराठी वा देशी भाषा आणि त्यांचे वाचक कमी झाल्याचे हे लक्षण नव्हे… ‘मराठी साहित्याचे वाचक कमी झाले वा होत असतील’ तर मात्र त्याची कारणे अन्यत्र शोधावी लागतील आणि त्याहीवेळी दूरचित्रवाहिन्या आणि त्यांचे वाढते आक्रमण हे सवंग व अनेकांचे आवडते कारण पुढे करून चालणार नाही. 

जगातल्या ज्या देशात दूरचित्रवाहिन्या फार पूर्वी आल्या आणि त्यांची सेवा भारतातल्या व महाराष्ट्रातल्या त्यांच्या सेवेहून मोठी आहे त्या देशात ग्रंथांचा खप व पुस्तकांचे वाचक वाढले आहेत. इंग्रजीत वा युरोपात प्रकाशित होणाऱ्या सामान्य लेखकाच्या कादंबरीची पहिली आवृत्तीच काही लाखांची निघते. ही बाब तेथे वाचकांची परंपरा मोठी असल्यामुळे घडली नाही. नित्शेसारख्या तत्त्वज्ञानी माणसाच्या पुढे जगप्रसिध्द झालेल्या ग्रंथाच्या फक्त सहा प्रती खपायला जर्मनीत कित्येक वर्षे लागली होती. नंतरच्या काळात मात्र पुस्तकांची पाने छापून होताच ती वाचायला वाचकांच्या रांगा छापखान्यांसमोर उभ्या झालेल्याही त्या भागाने पाहिल्या.

आपल्याकडेही अशा घटना घडल्या नाहीत असे नाही. लोकमान्यांच्या गीतारहस्याची पहिली आवृत्ती अवघ्या काही तासांत लोकांनी रांगा लावून व विकत घेऊन संपविली. पाच आणि सहा हजारांची आवृत्ती खपायला काही दिवस पुरे पडले अशा कहाण्या अलीकडेही आपण ऐकल्या आहेत. तत्त्वचिंतनपर व अवघड विषयांवर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांच्या आवृत्त्या अशाच हातोहात खपल्याची मराठीत उदाहरणे आहेत. ही उदाहरणे अपवाद म्हणून सोडून द्यायची नाहीत. तीच आजच्या काळजीवरचा खरा उपाय सांगणारी आहेत. जागतिक व राष्ट्रीय वाङमयाच्या परिक्षेत्रात आपण व आपले वाङमय कुठे बसणारे आहे आणि जागतिक व संगणकीय दृष्टी असणारा आजचा व उद्याचा वाचक यांना ते कितीसे भावणारे आहे या प्रश्नाचा आता फार परखड व अंतर्मुख होऊन विचार करणेच गरजेचे आहे. 

 

1 thought on “मराठीतील वैश्विकता आणि आत्मग्रस्तता”

  1. Very informative article.Keep posting these types of articles about marathi…I like marathi lekh about marathi bhasha..good reference about lokmanya Tilak gitarahsya.

Leave a Comment