गोव्यात कांग्रेसचा धुव्वा, भाजपाला स्पष्ट बहुमत

पणजी, दि. ०६ मार्च- गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पूर्णपणे धुव्वा उडाला असून भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या युतीने ४० सदस्यीय विधानसभेत २४ विजयी उमेदवारांसहीत पूर्ण बहुमत मिळवले आहे. काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचा या निवडणुकीत पराभव झाला असून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तर पूर्णपणे सफाया झाला आहे. विशेषतः एकाच कुटुंबातील अनेकांना उमेदवारी देण्याच्या विषयामुळे तापलेल्या या निवडणुकीत आलेमाव कुटुंबातील चारही जणांचा सफाया झाला आहे.

सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झालेल्या मतमोजणीनंतर दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व निकाल स्पष्ट झाले, परंतु सकाळी १० वाजेपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले होते. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने खाण, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य खाते तसेच इतर खात्यांद्वारे चालविलेल्या अमर्याद भ्रष्टाचाराविरूद्ध ही निवडणूक लढली गेली होती. यात चर्चिल आलेमाव, ज्योकीम आलेमाव, विश्वजित राणे, रवी नाईक, आलेक्स सिकेरा ही मंडळी भाजप – म. गो. युतीने आपले लक्ष्य बनवले होते. तथापी गृहमंत्री रवी नाईक, वीजमंत्री आलेक्स सिकेरा, नगरविकास मंत्री ज्योकीम आलेमाव, सार्वजनिक मंत्री चर्चिल आलेमाव, वनमंत्री फिलीप नेरी , नागरी पुरवठामंत्री जुझे फिलीप डिसोझा (राष्ट्रवादी काँग्रेस), पर्यटनमंत्री निळकंठ हळर्णकर (राष्ट्रवादी काँग्रेस), क्रीडा मंत्री बाबू आजगावकर यांचा निवडणुकीच दारूण पराभव झाला.

रवी नाईक फोंडा मतदारसंघात म. गो. उमेदवार लवू मामलेकर यांच्याकडून मोठ्या मताधिक्क्याने हरले, तर चर्चिल यांना अपक्ष उमेदवार आवेर्तिन फुर्तादो यांनी हरवले. ज्योकीम यांचा पराभव नव्यानेच निवडणूक लढवणारे भाजप उमेदवार राजन नाईक यांनी केला. आलेक्स सिकेरा यांना मिकी पाशेको यांनी नुवे मतदारसंघात लोळवले. चर्चिल यांची कन्या वालंका यांचा मिकी यांच्या सेव्ह गोवा पार्टीचे उमेदवार कायतान सिल्वा यांनी पराभव केला. ज्योकीम यांचे पूत्र यूरी यांना भाजपचे सुभाष फलदेसाई यांनी अस्मान दाखवले. फिलीप नेरी  यांचा बेंजामिन सिल्वा या अपक्ष उमेदवाराने अपेक्षेनुसार दणदणीत पराभव केला. दयानंद नार्वेकर यांना हळदोण मतदार संघात भाजपचे उमेदवार ग्लेन तिकलो यांनी मोठ्या मताधिक्क्याने हरवले. 

मंगळवारचे अनेक निकाल काँग्रेससाठी धक्कादायक ठरले. सांत आंद्रे मतदारसंघात भाजपच्या विष्णू वाघ यांनी यापूर्वी सतत तीन वेळा निवडून आलेले काँग्रेस उमेदवार फ्रान्सिस सिल्वेरा यांचा पराभव केला. सावर्डे मतदारसंघात अपक्ष उमेदवार अर्जुन साळगावकर (उद्योगपती) वडील अनिल साळगावकर यांच्या जागेवर उभे होते. परंतु भाजपचे अनुसूचित जमातीचे उमेदवार गणेश गावकर यांनी त्यांना मोठ्या मताधिक्क्याने हरवले. काणकोणात भाजपचे रमेश तवडकर तिसर्यां दा विजयी झाले. तवडकर हे अनुसूचित जमातीचे उमेदवार आहेत. या व्यतिरिक्त भाजपचे विधानसभेतील उपनेते फ्रान्सिस डिसोझा, मयेचे विद्यमान आमदार अनंत शेट, साळगावचे आमदार दिलीप परूळेकर, शिवोलीचे विद्यमान आमदार दयानंद मांद्रेकर हे मोठ्या मताधिक्क्याने पुन्हा विजयी झाले. भाजपमधून तिकीटाच्या लालसेने राजिनामा देऊन काँग्रेसमध्ये गेलेले राजेश पाटणेकर व दयानंद सोपटे यांचा अनुक्रमे डिचोली व पेडणे मतदारसंघात पराभव झाला. पाटणेकर यांना अपक्ष उमेदवार नरेश सावळ यांनी हरवले तर सोपटे यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष लशक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पराभव केला. अटीतटीच्या या निवडणुकीत फातोर्डा मतदारसंघांचे भाजप उमेदवार दामू नाईक व पर्वरी मतदारसंघाचे उमेदवार गोविद पर्वतकर यांचा पराभव झाला. उभयतांना प्रत्येकी विजय सरदेसाई (अपक्ष) व रोहन खंवटे (अपक्ष) यांनी पाडले. या निवडणुकीत अपेक्षेनुसार किमान पाच अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. पैकी तिघांना भाजपने पाठिबा दिला होता. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसशी सोनिया गांधींच्या काँग्रेसने निवडणूक युती केली होती त्या राष्ट्रवादी सर्वच्या सर्व सातही उमेदवारांचा निवडणुकीत पराभव झाला. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात झालेल्या जाहीर वादांचा आणि चव्हाट्यावर रंगलेल्या चर्चेचा राष्ट्रवादीला जबर किमत मोजावी लागली. मिकी पाशेको हा पक्ष सोडून गेल्यानंतर त्याची रयाच गेली होती. पक्षाच्या प्रभारी भारती चव्हाण यांच्या भोवती अनेक वाद निर्माण झाल्याने पक्षाचे प्रतिष्ठा अडचणीत आली होती.

भाजपने या निवडणुकीत अनुसूचित जमातीच्या, जातीच्या उमेदवारांना तिकीटे देऊन त्यांना निवडणून आणण्याचा पराक्रम केला. विशेषतः पहिल्यांदाच पक्षाने ६ ख्रिश्चन उमेदवारांना निवडून आणण्याची किमया साधली. यात माथानी साल्ढाणा (कुठ्ठाळी), ग्लेन तिकलो (हळदोण), निलेश काब्राल (कुडचडे), कार्लोस आल्मेदा (वास्को), फ्रान्सिस डिसोझा (म्पापसा) व मायकल लोबो (कळंगूट) यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त नावेली येथे चर्चिल यांच्या विरोधात आवेर्तिन फुर्तादो व वेळ्ळी येथे फिलीप नेरी यांच्या विरोधात बेजामिन सिल्वा या अपक्षांना पक्षाने आपले उमेदवार न उतरवता पाठिबा दिला होता.

या निवडणुकीत प्रतापसिग व विश्वजित हे राणे पितापूत्र अनुक्रमे पर्ये व वाळपई मतदारसंघातून निवडून आले. प्रतापसिग राणे यांची विधानसभा निवडणूक जिकण्याची ही सलग १० वी वेळ आहे. गोवा विधानसभेत ते १९७२ साली पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर १९७७, ८०, ८४, ८९, ९४, ९९, २००२, २००७ व आता २०१२ अशा सलग नऊ निवडणूका ते जिकले आहेत. संपूर्ण देशभरात हा विक्रम असण्याचीही शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपचे २१, म. गो. पक्षाचे ३, काँग्रेसचे ९, सेव्ह गोवा पक्षाचे २ व ५ अपक्ष उमेदवार निवडणूक आले आहेत.

दरम्यान, मनोहर पर्रीकर हे युतीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असून उद्यापर्यंत सरकार स्थापनेचा दावा ते करण्याची शक्यता आहे. भाजप – म. गो. च्या या दणदणीत विजयामुळे सध्या राज्यात विजयोत्सव सुरू आहे.

Leave a Comment