या त्या बिळात शिरू नका – बाळासाहेबांचा प्रेमाचा सल्ला

मुंबई, दि. २५ फेब्रुवारी – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी भेट घेतल्याने युतीमधील गैरसमज मावळले आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनाप्रमुखांची भेट घेऊन चर्चा करतील, असे भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले. दरम्यान, भाजपच्या कोअर कमिटीची बैठक शनिवारी बी-४ या विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर झाली. या बैठकीत भाजप-शिवसेना-रिपाई महायुती अभेद्य राहील आणि जिल्हापरिषद, महानगरपालिकांच्या अध्यक्ष तसेच महापौरपदाच्या निवडणुकांत महायुतीच्या घटकपक्षांखेरीज अन्य कोणत्याच पक्षाशी हातमिळवणी न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शनिवारी दुपारी भाजप नेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अनुक्रमे एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांनी ‘मातोश्री’ येथे शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही पक्षांमधील गैरसमज दूर झाले आणि युती अभेद्य असल्याचे स्पष्ट झाले. स्वतः बाळासाहेबांनी युती २४ वर्षांपासून अभेद्य आहे आणि यापुढेही राहील, असा विश्वास व्यक्त केला. तर आपल्या खास शैलीत महायुतीमधील कुणीही या-त्या बिळात जाणार नाही, जायचेच ठरले तर तो धोरणात्मक निर्णय माझा असेल, असे स्पष्ट केले.

या भेटदरम्यान शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊतही उपस्थित होते. तर उद्धव ठाकरे गोव्यात गेल्याने गैरहजर होते. शनिवारच्या भेटीमुळे गेल्या दोन दिवसात निर्माण झालेला गैरसमज दूर झाला, अशी ग्वाही दोन्ही बाजूच्या नेत्यांनी दिली. दरम्यान, या भेटीनंतर भाजप नेत्यांच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना सुधीर मुनगंटीवार यांनी नाशिकमध्ये महायुती महापौरपदाकरीता दावा करणार असल्याचे स्पष्ट केले. जेथे भाजपचे संख्याबळ जास्त असेल, तेथे भाजपचा आणि सेनेचे जास्त असेल तेथे सेनेचा महापौर होणार असल्याने महायुती अभेद्य राहील, असे मुनगंटीवार म्हणाले. येत्या काळात होणाऱ्या महापौर तसेच जि. प. अध्यक्ष पदाकरीता काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर न जाण्याचा निर्णय या बैठकीत झाला. एप्रिल महिन्यात २०१४ च्या विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन पक्षाची चितन बैठक पार पडेल, असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

‘मातोश्री’ भेटीत मनसेबाबत काहीच चर्चा झाली नाही. नागपूरात बहुजन समाज पक्षासोबत भाजप जाणार नाही. रिपाईचे सर्व गट आणि शिवसेना यांच्या मदतीने इथे भाजपचा महापौर बसेल, तर जळगावात सेना-भाजप सोबत येतील, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. शनिवारी बाळासाहेबांसोबत चांगल्या वातावरणात भेट झाली. नितीन गडकरी ‘मातोश्री’वर जावून शिवसेना प्रमुखांना भेटतील, असेही सुधीर मुनगंटीवार यांनीही स्पष्ट केले.

Leave a Comment