कर्नाटकातल्या भाजपा सरकारातील तिघा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आलेले आहे. विधानसभेचे कामकाज सुरू असताना हे तिघे आपल्या हातातल्या मोबाईलवर अश्लील चित्रफीत पहात होते, असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांचे हे कृत्य तसे उघड होण्याचे काही कारण नव्हते. परंतु यातले दोन मंत्री मोबाईलवरून काही तरी पहात आहेत हे एका पत्रकाराच्या लक्षात आले आणि वृत्तवाहिनीचे काम करणार्या या पत्रकाराने त्यांच्या या चित्रफीत दर्शनाचे चित्रीकरण केले. त्यांच्या मोबाईलवर कसली चित्रफीत होती हे काही नक्की कळत नाही. पण ती अश्लील असावी, असे सूचित होते. त्यामुळे या व्हिडीओ पत्रकाराने केलेले ते चित्रण दिवसभर वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आले. भाजपाचे तीन मंत्री विधानसभेचे कामकाज सुरू असताना कामकाजात सहभागी होण्याऐवजी हातातल्या मोबाईल फोनवरून अश्लील चित्रफिती बघत बसतात असे चित्र निर्माण झाले. ही गोष्ट सरकार आणि भारतीय जनता पार्टी यांच्यासाठी अप्रतिष्ठेची ठरली. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने या तीन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले.
हा प्रकार घडल्यानंतर त्याचे पडसाद वृत्तपत्रात उमटणे साहजिक होते. काही वृत्तपत्रांनी भारतीय जनता पार्टीवर तोंडसुख घेण्याची ही संधी चांगलीच साधली. भारतीय जनता पार्टी आणि नैतिकता या संबंधात एखादी अशी घटना घडली की, भारतीय जनता पार्टीला झोडपून काढण्याचा जोश काही लोकांना येतो आणि भाजपाची लाज, लज्जा, नैतिकता, संस्कृती अशा गोष्टींवर टीका करण्याची खाज हे लोक बुजवून घेतात. अशी संधी मिळाल्यावर फारशी शहानिशा न करता ते आपल्या लेखणीचे घाव भाजपावर घालायला लागतात. शहानिशा करतो कोण? तशी पत्रकारिता आता राहिली आहे कोठे? या घटनेचे काही वृत्तपत्रात उमटलेले पडसाद आणि वस्तुस्थिती या गोष्टी ताडून पाहिल्या असता या टीकेमध्ये भाजपा आणि ते मंत्री या तिघांवरही झालेली टीका अनावश्यक आणि अतिशयोक्त आहे हे पटकन लक्षात येते. कामभावना ही आदिम भावना आहे. ती कोणालाही चुकलेली नाही. विशेषतः भारतीय संस्कृतीमध्ये कामसंबंध हा विषय जाहीर प्रदर्शनाचा आणि चर्चेचा मानला जात नाही. त्यावर काही बंधने आहेत आणि अशी बंधने घातली की माणसाची कामभावना अनैसर्गिक आणि विकृतपणे व्यक्त व्हायला लागते. अश्लील चित्रफिती पाहणे हा त्यातलाच प्रकार.
असे असले तरी कर्नाटक विधानसभेत घडलेली घटना अशा विकृत कामभावनेतून घडली आहे का, याचा शोध घेण्याच्या भानगडीत कोणी पडलेले नाही. भाजपा विरोधाची संधीच पाहणार्या पत्रकारांनी तर खरी गोष्ट माहीत असून सुद्धा ती लपवून टीकेची हौस भागवून घेतली. हे तिन्ही मंत्री विकृत कामभावनेने पछाडलेले आहेत असे टोकाचे प्रतिकूल मत गृहित धरले तरी ते या भावनेपोटी कुठली तरी एक अश्लील चित्रफीत आणून मिटक्या मारत भर विधानसभेत पहात बसतील असे संभवतच नाही आणि तसे झालेलेही नाही. झालेली गोष्ट अशी आहे की, हे मंत्री जी चित्रफीत पहात होते त्या चित्रफितीवर विधानसभेत वादळी चर्चा होणार होती. ती चर्चा काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केली होती. मंगलोर जिल्ह्यातल्या मेरी आयलंड येथे राज्याचे पर्यटन विकास खाते आणि एका खाजगी संस्थेने मिळून ही रेव्ह पार्टी पर्यटन विकासाचा एक भाग म्हणून आयोजित केलेली होती. परंतु या पार्टीमध्ये एका परदेशी दांपत्याने नशिल्या पदार्थाच्या धुंदीत उघड्यावर नको तो प्रकार केला आणि त्याची चित्रफीत काढली गेली. अशा प्रकाराची जबाबदारी नकळतपणे सरकारवरच येते. म्हणून काँग्रेसच्या काही आमदारांनी हा विषय विधानसभेत उपस्थित केला होता आणि या विषयावर चर्चा करावी अशी मागणी केली होती.
आजकाल कोणत्याही चित्रफिती मोबाईलवर एसएमएस द्वारे पाठवणे सोपे झालेले आहे. या तीन मंत्र्यांतील जे कृष्णा पालेमार हे मंगलोर जिल्ह्यातले आहेत आणि त्यांच्या मोबाईलवर ही चित्रफीत उपलब्ध झाली होती. या जिल्ह्याचा आमदार म्हणून त्यांना नेमका काय प्रकार झाला आहे हे कळणे आवश्यकच होते. म्हणून त्यांनी ती चित्रफीत मिळवली आणि ती नेमकी काय आहे हे सी.सी. पाटील आणि लक्ष्मण सावदी या दोन मंत्र्यांनी पाहिली. हा प्रकार अश्लील चित्रफिती बघण्याचा आहे असे म्हणता येईल का? उद्या या विषयावर विधानसभेत चर्चा होईल तेव्हा सभापती, विरोधी पक्ष नेते हे सारेच लोक या संबंधात काही निर्णय घेण्याआधी ही चित्रफीत पाहणार आहेत की नाही? त्यांचे ते चित्रफीत पाहणे हे विकृतीत जमा होईल का? की कर्तव्याचा भाग होईल याचा विचार कोण करायचा? एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने हे दृश्य टिपले आणि त्याचा आगापिछा न बघता, पार्श्वभूमीचा विचार न करता सर्वांनी त्याच्या विरुद्ध कावकाव सुरू केली. हे काही विचारशीलतेचे लक्षण नाही. आता या प्रकाराची चौकशी होणार आहे. चौकशीमध्ये ही पार्श्वभूमी समोर येईलच. तेव्हा भाजपावर आणि या मंत्र्यांवर तोंडसुख घेणारे तोंडघशी पडतील.
