व्हीजन-२०३०

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सी.के. जोशी आणि डॉ. डी.पी. त्रिपाठी यांच्या अभ्यास गटाने व्हीजन-२०३० हा कृषी विकासाचा मोठा दस्तावेज तयार केला आहे.१९६० च्या दशकामध्ये भारतात गहू आणि तांदळाच्या नव्या जाती रूढ झाल्या आणि त्यातून भारतात हरित क्रांती झाली. त्यानंतर या देशामध्ये कृषी उत्पादनाच्या वाढीचे विशेष प्रयत्न झाले नाहीत. काही छोटे-मोठे प्रयत्न झाले हे नक्की. कारण दोन वर्षांपूर्वी तुरीच्या दाळीची टंचाई जाणवायला लागल्यामुळे तुरीच्या उत्पादनात वाढ करण्याचा एक प्रयोग राबवला गेला. त्यातून तुरीचे उत्पादन वाढले. त्याशिवाय शरद पवार यांनी कृषी मंत्री झाल्यानंतर गव्हाच्या उत्पादनात वाढ करण्याचा एक प्रयोग केला. त्यात देशाच्या पूर्वोत्तर भागातील जमीन बर्‍याचअंशी सुपीक असूनही पडीक आहे असे लक्षात आले. त्या जमिनी लागवडीखाली आणल्यामुळे गेल्या दोन वर्षात गव्हाच्याही उत्पादनात वाढ झाली. परंतु ही वाढ शाश्वत स्वरुपाची नाही. देशातली टंचाई विचारात घेऊन उत्पादनात वाढ करण्यासाठी केलेली ही तात्पुरती उपाययोजना आहे.
    व्हीजन-२०३० मध्ये मात्र भारताचे शेती उत्पादन कायमचे वाढले पाहिजे असे काही उपाय सुचविण्यात आले आहेत. शेतीच्या विकासामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टींचा उल्लेख केलेला असतो. पहिले म्हणजे पाणी आणि दुसरे म्हणजे बियाणे. १९६० च्या दशकातली हरित क्रांती ही बियाणांच्या संशोधनामुळे झालेली आहे. परंतु त्यानंतर झालेली धान्याच्या उत्पादनातली वाढ ही पाण्याच्या उपलब्धतेमुळे झालेली आहे. शेवटी पाणी महत्वाचे आहेच. कारण पाणी हे शेतीचे सर्वाधिक महत्वाचे साधन आहे. भारतातली ५० टक्के शेती तरी अजून पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसाने गुंगारा दिला की, या शेतावर जगणारे शेतकरी देशोधडीला लागतात. म्हणून हक्काचे पाणी शेती विकासासाठी आवश्यकच आहे. तेव्हा बियाणे आणि पाण्याची उपलब्धता या दोन गोष्टी तर घडल्या पाहिजेतच. परंतु शेतीच्या विकासाचे शास्त्र या दोन गोष्टींच्या पलीकडे गेलेले आहे आणि शेतीमध्ये तंत्रज्ञान हा शब्द अधिक परवलीचा व्हायला लागला आहे. तेव्हा व्हीजन-२०३० या दस्तावेजामध्ये तंत्रज्ञानावर अधिक भर देण्यात आलेला आहे. पाणी तेच, जमीन तीच आणि बियाणेही तेच पण शेतीचे तंत्र बदलले की उत्पादनात वाढ होते, असा हा तंत्राचा महिमा आहे.
    व्हीजन-२०३० मध्ये कमी पाण्यात अधिक उत्पादन कसे करता येईल, याचे दिग्दर्शन करण्यात आलेले आहे. त्यासाठी पाणी पुरवठ्याच्या सुधारित योजना राबविण्याची गरज आहे. सध्या आपल्या देशात पाणी बर्‍यापैकी उपलब्ध आहे म्हणून आपण ते उधळपट्टी करून वापरत असतो. आपण सध्या कोणत्याही पिकासाठी जेवढे पाणी वापरतो त्या पाण्याचा वापर आपण सुधारित पद्धतीने केला तर तेवढ्याच पाण्यात चौपट शेती बागायती होऊ शकते. एक एकर उसाला मोकाट पद्धतीने जेवढे पाणी दिले जाते तेवढेच पाणी ठिबक सिचनाने दिले तर त्या पाण्यात आठ एकर ऊस भिजू शकतो एवढी ठिबक सिचनाची किमया मोठी आहे. कधी काळी आपल्या देशातल्या द्रष्ट्या नेत्यांनी देशातली सगळीच जमीन बागायती आणि हक्काचे पाणी मिळणारी हवी असे स्वप्न पाहिले असेल तर ते स्वप्न ठिबक सिचनाने साकार होऊ शकते, असे आता दिसत आहे. परंतु उघड उघडपणे दिसणारी ही वस्तुस्थिती आपण  म्हणाव्या तेवढ्या गांभीर्याने विचारात घेत नाही हे आपले दुर्दैव आहे. यासाठी दृष्टीकोनाची तर गरज आहेच पण ठिबक सिचनाचे संच कमीत कमी किमतीत कसे उपलब्ध होतील यासाठी संशोधन होण्याची जास्त गरज आहे. एक एकर शेताला ठिबक सिचनाने पाणी देणारा संच कोणी पाच हजार रुपयात उपलब्ध करून दिला तर त्याला भारतरत्न किताब द्यायला हरकत नाही इतके या संशोधनाचे महत्व आहे.
    सध्याच्या काळामध्ये तंत्रज्ञान हा शब्द फार परवलीचा झाला आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये नवे तंत्रज्ञान विकसित झाले की त्या क्षेत्रातील क्षमता अचानकपणे कैकपटीनी वाढते याचा अनुभव आपण माहिती तंत्रज्ञानात घेत आहेतच. तसाच प्रकार शेतीच्या बाबतीत झाला तर शेतीच्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे. टिश्यू कल्चर, बीटी बियाणे, ठिबक सिचन अशा प्रकारची तंत्रज्ञाने उपलब्ध झाल्यामुळे आपल्या शेतीमध्ये मोठे परिवर्तन घडलेले सुद्धा आहे. परंतु या तंत्रज्ञानांनी भारतातल्या शेतीची उत्पादन क्षमता कैक पटींनी वाढायला हवी होती. असे अजून घडलेले नाही. आपल्या देशातले कृषी उत्पादन सध्या २५ कोटी टनाच्या जवळपास गेलेले आहे. परंतु भारताएवढीच शेतजमीन उपलब्ध असून आणि हवामान भारतापेक्षाही वाईट असून चीनमध्ये मात्र ५५ कोटी टन धान्य उत्पादन होते. ही किमया कशाची आहे, याचा शोध घेतला पाहिजे. व्हीजन-२०३० मध्ये त्याचा शोध घेतला गेला असावा अशी अपेक्षा आहे. व्हीजन-२०३० हा भारताचा महाशक्ती होण्याकडील वाटचाल सोपी करणारा दस्तावेज ठरला पाहिजे.
 

Leave a Comment