ठाकरे -पवार जुगलबंदी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना तिकिट हवे असेल तर परीक्षा द्या अशी तंबी दिली आहे.ही परीक्षा येत्या ३ तारखेला होईल.ती ज्या संदर्भ पुस्तिकेच्या आधारावर होईल ती संदर्भ पुस्तिकाही कार्यकर्त्यांना लवकरच दिली जाईल.अशी परीक्षा असावी की नसावी यावर कोणाचे दुमत होईल पण राज ठाकरे यांना अशी परीक्षा आवश्यक वाटत आहे. नाही तर कसलीही पात्रता नसलेले आणि काहीही माहिती नसलेले लोक निवडून येतात आणि त्यामुळे ते चांगला कारभार करू शकत नाहीत. आपल्या लोकशाहीची ही कुचेष्टा आहे. तेव्हा परीक्षा नाही तर तिकिट नाही. बस्स राजसाहेब गरजले पण आपल्या या गरजण्याने आपली एका भांडणातली बाजू कच्ची होत आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही.कसली परीक्षा नाही, अभ्यास नाही आणि माहिती नाही पण ते स्वतः मात्र कापूस उत्पादकांच्या मागण्यांसाठी आंदोलन उभे करायला निघाले आहेत. मग अजित पवार यांनी त्यांना हटकले. आपल्या पक्षातल्या इच्छुकांना परीक्षेचा आग्रह धरणार्‍या राज ठाकरे यांना शेतीचा अभ्यास न करता आंदोलन करण्याचा काय अधिकार ? पण त्यांच्या परीक्षेचा संदर्भ न देता त्यांनी ठाकरे बंधूंना अडवले.त्यातून अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यात वाद सुरू झाला आहे. ज्यामध्ये या दोघांनीही आपल्या स्वभावाला अनुसरून प्रत्येकाचे बापजादे काढलेले आहेत. परंतु ही भाषा हा त्यांच्या स्वभावाचा आविष्कार आहे असे समजून आपण त्यातला मुद्दा समजून घेतला पाहिजे.

अजित पवार यांनी ‘ठाकरे यांच्या बापजाद्यांनी कधी हातात नांगर धरला आहे का?’ असा प्रश्न केला आहे. त्याला उत्तर देताना राज ठाकरे यांनी,‘पवारांच्या बापजाद्यांनी कधी क्रिकेट खेळलेले आहे का?’ असा सवाल केला. एकंदरीत या दोघांच्या म्हणण्यातला मथितार्थ असा की, ‘ठाकरे यांच्या वाडवडिलांनी आणि स्वतः ठाकरे यांनी कधी शेती केलेली नाही. त्यामुळे त्यांना शेतीच्या विषयातले काही कळत नाही.’याउलट राज ठाकरे यांचे म्हणणे असे की,‘पवारांच्या वाडवडिलांनी कधी क्रिकेट खेळलेले नाही. मग पवार आणि त्यांचे काका क्रिकेटच्या संघटनांमध्ये कशाला हवेत?’ या दोघांच्याही म्हणण्यात तसा अर्थ काहीच नाही. पण त्यातून एक फार मोठा प्रश्न उपस्थित होतो. भारतात लोकशाहीचा अंमल  सुरू झाल्यापासून यावर चर्चा होत आली आहे. विशेषतः उच्चभ्रू लोकांमध्ये ही चर्चा जास्त होत असते.त्यात सामान्य माणसांनी निवडून दिलेल्या मंत्र्यांच्या कथित अडाणीपणावर फार तिरकसपणे चर्चा होत असते. ज्याला ज्यातले काही कळत नाही तो त्या खात्याचा मंत्री होतो ही फारच विपरीत गोष्ट आहे आणि देशाच्या विकासातला हा एक मोठा अडथळा आहे असे या लोकांचे म्हणणे असते. या न्यायाने संरक्षणमंत्री हा युद्धतंत्रातला तज्ञ हवा  आणि कृषी मंत्री होण्यासाठी नांगर चालवता आला पाहिजे. डॉ. सी. सुब्रम्हण्यम् हे शेतकरी नव्हते पण त्यांच्या या मंत्रिपदाच्या काळात भारताला अन्नधान्याच्या क्षेत्रात स्वावलंबी करणारी हरित क्रांती झाली. भारताने पाकिस्तानला १९६५ आणि १९७२ च्या युद्धात धूळ चारली तेव्हा  देशाचे संरक्षणमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण काम करत होते. ते कधी लष्करात गेलेलेच नव्हते.

अजित पवार यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. एखाद्या देशाचा किवा राज्याचा जनप्रतिनिधी हा जनतेचा प्रतिनिधी असतो. राज्य किवा देश पातळीवरील कायदे मंडळांमध्ये जे कायदे केले जातात त्या कायद्यांमध्ये लोकांच्या आकांक्षा आणि लोकांच्या गरजा प्रतिबिबित होतात की नाही, हे बघणे या जनप्रतिनिधीचे काम असते. त्याला हे बघत असताना अनेक विषयांचा विचार करावा लागतो. शेती, उद्योग, शिक्षण, पर्यावरण, तंत्रज्ञान असे अनेक विषय असतात आणि त्या त्या विषयाची धोरणे ठरवणारे तज्ञ लोक ते ठरवत असतात पण त्यांनी तसे ठरवले तरी त्यामध्ये जनतेच्या जीवनाशी अनुरूप असे काही नसेल तर ती गोष्ट दाखवून देणे हे जनप्रतिनिधीचे काम असते. मूलतः लोकशाहीमध्ये हेच अपेक्षित असते. हा जनप्रतिनिधी या सर्व विषयांचा तज्ञ असावाच असे नाही. परंतु जनतेच्या भावनांची मात्र त्याला जाणीव असली पाहिजे. समाज जीवनाची नाडी त्याला कळली पाहिजे. एवढे त्याचे काम आहे. भाजपा-शिवसेना युतीच्या नेत्यांना शेतीतले काही कळत नाही, असा अपप्रचार केवळ अजित पवारच नव्हे तर शरद पवार सुद्धा करत आलेले आहेत. आता भाजपामध्ये स्वतः शेती केलेले अनेक नेते आहेत. त्यामुळे आता आपल्या काकांच्या या अपप्रचाराचे लोण पुढे चालू ठेवताना अजित पवार यांनी त्यातून भाजपाला वगळले आहे आणि ठाकरे यांना म्हणजे ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केले आहे. मागे शरद पवार यांनी असाच प्रचार सुरू केला तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्याला अतिशय संयमित शब्दात उत्तर दिले होते. ‘आम्ही स्वतः शेती केलेली नाही, परंतु शेती चांगली करण्यासाठी हक्काचे पाणी हवे आणि त्यासाठी देशामध्ये मोठ्या प्रमाणावर पाटबंधार्‍याच्या योजना राबवल्या पाहिजेत एवढे तरी आम्हाला नक्कीच समजते. ते समजायला शेती तज्ञ असावे लागत नाही.  कापसाच्या उत्पादनावर होणारा खर्च भरून निघेल एवढा तरी भाव शेतकर्‍यांना दिला पाहिजे एवढे आम्हाला नक्की समजते.’
     

Leave a Comment