प्रियकर आणि तिच्या वागदत्त वधूला पेटवणार्‍या अनुश्रीला २१ नोव्हेंबरपर्यंत कोठडी

पुणे,दि.१५ नोव्हेंबर- प्रियकराने लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरून प्रियकर व त्याच्या वाग्दत्त वधूस पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणार्‍या अनुश्री कुंद्रा हिला कॅन्टोनमेंट न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे. तत्पूर्वी अनुश्री न्यायालयाला शरण आली होती. या घटनेत वाग्दत्त वधूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. दोन महिन्यांपासून अनुश्री जामीनावर होती. मंगळवारी सकाळी ती कॅन्टोनमेंट न्यायालयासमोर शरण आली. त्यानंतर झालेल्या सुनावणीत तिला २१ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
१३ ऑक्टोंबर रोजी ही खळबळजनक घटना घडली होती. मीनेश सिन्हा (रा. फ्लोअर व्हिलेज, वानवडी), जुही प्रसाद (रा. कॅनॉट प्लेस, दिल्ली) व अनुश्री कुंद्रा (रा. बंगळूर) हे तिघे एकाच फ्लॅटमध्ये मुक्कामास होते. मीनेश हा विमाननगर येथील एका खासगी कंपनीत व्यवसाय विकास व्यवस्थापक आहे. जुही दिल्लीत वकिली करीत होती. मीनेश व अनुश्री यांचे काही दिवसांपासून प्रेम होते. अनुश्री बंगळूर येथील आयटी कंपनीत नोकरीला होती. घरगुती अडचणीमुळे लग्न करण्यास मीनेशने अनुश्रीला नकार दिला होता. त्यानंतर त्याचे जुहीशी लग्न ठरले व ते लवकरच लग्न करणार होते. त्याचा अनुश्रीला राग आला होता. अनुश्री व जुही या मैत्रिणी होत्या. 
१३ ऑक्टोंबरच्या रात्री वानवडी येथे मीनेश राहत असलेल्या फ्लोअर व्हिलेजमध्ये अनुश्री, जुही आणि मीनेश हे तिघेही मुक्कामाला होते. पहाटे अनुश्री लवकर उठली. तिने झोपलेल्या जुही व मीनेश यांच्या अंगावर पेट*ोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. नंतर अनुश्री तेथून पळून गेली. स्थानिक नागरिकांनी या दोघांना वानवडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेत जुही ८० टक्के, तर मीनेश १० टक्के भाजला होता. रुग्णालयात जुहीचा मृत्यू झाला होता.

Leave a Comment