वॉशिग्टन, दि.०१ ऑक्टोबर- जंगली पशुला अभय दिल्यास आपल्याला नव्हे तर आपल्या शेजार्यालाच त्याचा उपद्रव होईल, असा पाकिस्तानचा समज असावा. मात्र इतिहासात घडलेली उदाहरणे अभ्यासली तर लक्षात येईल की, तो पशू आपला सुद्धा घातच करतो. पाकिस्तानने आत्तापर्यंत भारताविरोधात दहशतवादाचा वापर केला आहे. मात्र असे करून पाकिस्तान गंभीर आणि सामरिक चूक करीत आहे, असा स्पष्ट इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तानला दिला आहे.
पाकिस्तानच्या आश्रयाने असलेल्या दहशतवादी संघटनांकडून अमेरिकेला कोणताही उपद्रव होऊ नये, यासाठी आम्ही सर्व स्तरांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील आहोत,अशी पुस्तीही हिलरी क्लिंटन यांनी जोडली.अंतर्गत धोक्यापासून पाकिस्तानचे रक्षण करणे तसेच जागतिक भविष्य सुरक्षीत करण्यासाठी अफगाणिस्तानला सक्षम बनविणे ही देखील अमेरिकेची उद्दिष्टे असल्याचे क्लिंटन यांनी स्पष्ट केले.
रशियाच्या फौजांना अफगाणिस्तानमधून पाठी रेटण्यासाठी अमेरिकेनेच पाकिस्तान आणि तालिबानी गटांचा वापर केला होता. इतकेच नव्हे तर या दहशतवादी गटांना आर्थिक रसद पुरवून त्यांना मजबूत बनविले होते. आज अमेरिका आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अत्यंत जटील स्थितीपर्यंत येऊन पोहोचले आहेत, असे पाकिस्तानी मुत्सद्दी आपल्याला वारंवार बजावत असल्याचे क्लिंटन यांनी नमूद केले. मात्र या दहशतवादी गटांचा वापर पाकिस्तानने भारताविरोधात काश्मीरमध्येही केला. सध्या तर पाकिस्तानी सरकार त्यांच्याच देशात दहशतवादी हल्ले घडविणार्या तालिबानी गटांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. याचाच अर्थ चांगले आणि वाईट असे दहशतवादी गट निर्माण झाले आहेत. यातील चांगल्या गटांना अमेरिकेने सहाय्य केले होते, असा अजब युत्त*ीवाद देखील क्लिंटन यांनी आपल्या देशाच्या धोरणांचे समर्थन करताना केला.
दहशतवादाचा बीमोड करण्यातच पाकिस्तानचे हित असल्याचे क्लिंटन यांनी स्पष्ट केले. मात्र पाकिस्तानची सध्याची दहशतवादविरोधी लढ्यातील सक्रियता पाहता त्यांचे भारताशी असलेले संबंध आणि अफगाणिस्तानमध्ये असलेले अमेरिका आणि दोस्त राष्ट*ांचे सैन्य पाठी घेतल्यानंतर या क्षेत्रात निर्माण होणारी राजकीय स्थिती अत्यंत गंभीर असेल, असा इशाराही क्लिंटन यांनी दिला.