
पंतप्रधान मनमोहनसिग यांनी अमेरिकेतून परत आल्यावर चिदंबरम यांना वाचवण्याचे काम हाती घेतले आणि त्यांना तूर्तास वाचवले. तूर्तास म्हणजे त्यांनी चिदंबरम यांना प्रणव मुखर्जी यांच्या चिठ्ठी अस्त्रापासून वाचवले. खरे तर त्यांना कायम वाचवण्याची गरज आहे कारण चिदंबरम यांच्या गळ्याभोवती २ जी स्पेक्ट*म भ्रष्टाचाराचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे. खरे तर मनमोहन सिग यांना चिदंबरम यांची एवढी काळजी करण्याचे काही कारण नाही. चिदंबरम तुरुंगात जाऊन ए. राजा यांच्या शेजारी जाऊन बसले तर मनमोहन सिग यांना आनंदच होणार आहे. पण २ जी चे त्रांगडे असे काही आहे की चिदंबरम यांनी अडकणे म्हणजे मनमोहनसिग यांनी अडकणे. आज चिदंबरम तिहार तुरुंगात ए. राजा यांच्या शेजारी जाऊन बसले तर उद्या मनमोहन सिंग यांनाही चिदंबरम यांच्या शेजारी जाऊन बसावे लागणार आहे. म्हणून मनमोहनसिग चिदंबरम यांना वाचवण्याची पराकाष्ठा करीत आहेत. या पराकाष्ठेचा एक भाग म्हणजे त्यांनी आणि सोनिया गांधी यांनी प्रयत्न करून आयोजित केलेली प्रणव मुखर्जी आणि चिदंबरम यांची संयुक्त पत्रकार परिषद.
प्रणव मुखर्जी यांनी या पत्रकार परिषदेत झालं गेलं गंगेला मिळालं असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या बाबतीत चिदंबरम यांच्यावर बालंट आले होते. त्यामुळे अशी पत्रकार परिषद घेऊन असा खुलासा केला जाणे ही त्यांची गरज होती. म्हणून पत्रकार परिषद होताच त्यांनी समाधान व्यक्त केले. या सगळ्या घटनांत जी चिठ्ठी उघड झाली आहे ती प्रणव मुखर्जी यांनी पाहिलेली आणि चिदंबरम यांना अडचणीत आणणारी होती. केन्द्रीय मंत्रिमंडळातल्या ज्येष्ठ मंत्र्याने दुसर्या मंत्र्याला अडचणीत आणणारी अशी चिठ्ठी लिहिण्याने सरकारच अडचणीत आले होते आणि चिदंबरम व्यक्तिशः अधिक संकटात सापडले होते. तेव्हा या संदर्भात स्वतः प्रणव मुखर्जी यांनीच खुलासा करणे हे अधिक सोयिस्कर झाले असते. ते सरकारसाठी तर सोयिस्कर होतेच पण चिदंबरम यांच्यासाठी जास्तच गरजेचे होते.प्रणव मुखर्जी यांनी तसा खुलासा केला. त्या वादग्रस्त चिठ्ठीशी माझा काही संबंध नाही आणि ती मी तयार केलेली नाही असा त्यांनी खुलासा केला. पण या खुलाशाने कोणाचे समाधान झालेले दिसत नाही. या खुलाशाने स्पष्टीकरण होण्याच्या ऐवजी नवे प्रश्नच अधिक निर्माण झाले आहेत आणि वातावरण पुन्हा तसेच संशयाने भारलेले राहिले आहे.
या पत्रकार परिषदेचा विषय चिदंबरम यांना दिलासा देणे हा होता पण ही पत्रकार परिषद या दोघांनी ठरवून घेतलेली नाही. ती सोनिया गांधी यांनी आदेश दिल्यामुळे घेतलेली आहे. तिच्यात प्रणव मुखर्जी यांचा सहभाग सक्तीने झाल्यासारखा आहे. पत्रकार परिषद झाल्यानंतर चिदंबरम यांनी आपले समाधान झाले आहे असे जाहीर केले. पण प्रणव मुखर्जी यांनी अशी कसलीही प्रतिक्रिया नोंदवली नाही. त्या अर्थी हा सारा चिदंबरम यांना दोषमुक्त भासवण्यासाठी चाललेला एकतर्फी प्रयास होता असे दिसते. प्रणव मुखर्जी यांनी केवळ, ती चिठ्ठी आपली नव्हती असे जाहीर केले. ती चिठ्ठी पाठवली गेली होती हे मात्र त्यांनी मान्य केले. त्यात व्यक्त झालेली मते केवळ आपल्या खात्याने नव्हे तर अर्थ, पंतप्रधान कार्यालय आणि दूरसंचार खाते या तीन तीन खात्याच्या सचिवांची आहेत आणि ती विचारांती तयार झालेली होती असे त्यांनी सांगितले. याचा अर्थ त्यांनी या चिठ्ठीतल्या मजकुराला एक प्रकारे अप्रत्यक्षपणे दुजोराच दिला असा होतो. ही मते माझी नाहीत असे म्हणून प्रणव मुखर्जी यांनी संदिग्धता कायम ठेवली. आपल्याला ही मते मान्य नाहीत असे त्यांनी निःसंदिग्धपणे सांगितलेच नाही.
या सार्या प्रकाराने चिदंबरम यांनी सुटकेचा निःश्वास सोडावा इतका दिलासा त्यांना मिळाला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चिठ्ठी प्रणवदांची नाही हे स्पष्ट झाले पण ती चिठ्ठी अस्तित्वात आहे हे काही कोणी नाकारलेले नाही. पण ती अस्तित्वात असली तरी ती चिदंबरम यांना किती त्रासदायक ठरेल याविषयी शंकाच आहे. खरे तर या चिठ्ठीत पी. चिदंबरम यांच्या विरोधातला पुरावा म्हणून काही दम नाही. माहितीच्या अधिकाराखाली काम करणार्या एका कार्यकर्त्याने पंतप्रधान कार्यालयातून या चिठ्ठीशिवाय अनेक कागद मिळवलेले आहेत. त्यात ही चिठ्ठी आहे. ती कागदपत्रे पंतप्रधान कार्यालयातून बाहेर पडली आहेत. त्यातली ही चिठ्ठी डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात चिदंबरम यांच्या विरोधातला पुरावा म्हणून सादर केली आहे. तिला पुरावा मानावा की नाही याचा निर्णय तर न्यायालय करणार आहे. तो निर्णय होईल तोपर्यंत चिदंबरम यांच्या विरोधातले वातावरण निवळले आहे असे ठामपणे म्हणता येत नाही. तूर्तास तरी त्यांच्या विरोधातले पक्षातले वादळ शमले आहे. न्यायालयात वादळ येणार की नाही हे येत्या दोन तीन दिवसांत ठरणार आहे. पी. चिदंबरम या चिठ्ठीमुळे अडचणीत आले असल्याचे काही पत्रकारांनी म्हटले पण ते अडचणीत आहेत की नाही हे न्यायालयात ठरणार आहे. पत्रकार तसे म्हणू शकत नाहीत.
