शासनाच्या बंदीला न जुमानता बैलगाडा शर्यती जोमाने घेतल्या जातील-बैलगाडी संघटना

पुणे दि.२९-क्रूएल्टी टू अॅनिमल कायद्यानुसार बैलगाडा शर्यतीवर राज्य शासनाने आणलेल्या बंदीला न जुमानता बैलगाडा शर्यती पूर्वीइतक्याच जोमाने घेतल्या जातील असे बैलगाडी संघटनेने जाहीर केले आहे. गणेशोत्सवात दरवर्षीप्रमाणेच यंदाही भोसरीत पाच दिवस बैलगाडा शर्यती मोठ्या उत्साहात पार पडल्या असून गुरूवार, शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील सिकोरी व कळंब येथे तर शनिवार व रविवारी साबळवाडी व चाकण येथेही बैलगाडा शर्यती होणार असल्याचे समजते.
  शासनाने बैलगाडा शर्यतीवर आणलेली बंदी अन्यायकारक असल्याचे व त्यामुळे या बंदीचा निषेध करण्यात येत असल्याचे  बैलगाडा मालकांचे म्हणणे आहे. शासनाने बंदी आणताना बैलांचा छळ केला जातो, त्यांना दारू पाजली जाते असली कारणे दिली आहेत. मात्र प्रत्यक्षात बैलगाडा मालक या बैलांना पोटच्या मुलंाप्रमाणे सांभाळत असतो. वर्षभर त्याला चांगले खाऊपिऊ घालून कांहीही काम न करता बसवून ठेवले जाते व केवळ जत्रेतच त्यांना बाहेर काढले जाते असे या मालकांचे म्हणणे आहे. या बैलांसाठी मालक लाख रूपयांहूनही अधिक किमत मोजत असताना बैलाचा छळ कसा करेल असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
  बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष भानुदास लांडगे म्हणाले की गतवर्षीही अशीच बंदी आणली गेली होती ती आम्ही न्यायालयात दाद मागून उठविली. आताही पुन्हा न्यायालयात आम्ही धाव घेतली आहे. आमच्यासोबत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार विलास लांडे हेही आहेत. शासनाच्या बंदी हुकुमाला आम्ही घाबरत नाही असेही त्यांनी सांगितले.
  संघटनेचे सदस्य आबा लांडगे म्हणाले की ग्रामीण भागात बैलगाडा शर्यती ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्रथा असून नवसाचे बैलगाडे पळविण्याची अनेक कुटुंबांची परंपरा आहे. कुलदेवतेच्या यात्रांदरम्यान म्हणूनच या शर्यती होत असतात. शर्यतीत क्वचित कधीतरी बैल जखमी होतोही . पण मग कुस्त्यांच्या फडातही कित्येकवेळा पैलवानाचा हातपाय तुटतो, मोडतो. मग कुस्त्यांवर बंदी घालायची काय? ग्रामीण भागात बैलगाडा मालक असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण आहे. तसेच या शर्यती ंहा शेतकर्‍यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो व म्हणूनच जेथे शर्यती असतील तेथे मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहात असतात.
   अनेक बैलगाडा मालकांनी निवडणूका जवळ आल्यावरच ही बंदी कशी येते असा सवाल उपस्थित केला आहे. आंबेगांव तालुक्यात तर शिवसेना आणि राष्ट*वादी र्कांग्रेसने बैलगाडा विमा योजनाही राबविली असून शर्यतीदरम्यान बैलांना दुखापत झाली तर रोख स्वरूपात भरपाई देण्यात येते असेही हे मालक म्हणाले. गेल्या पाच वर्षात अशी अनेकवेळा बंदी आली पण राजकीय पक्षांनीच बंदीविरोधात पुढकार घेतला असल्याचे सांगून ते म्हणाले की या शर्यती म्हणजे ग्रामीण भागात मोठी उलाढाल असते. मोठ्या प्रमाणावर खरेदीविक्री होते तसेच अनेकांना या काळात रोजगारही मिळतो, गावातील व्यवसाय वाढतो व त्यामुळेच शर्यतींची लोकप्रियता अफाट आहे.

1 thought on “शासनाच्या बंदीला न जुमानता बैलगाडा शर्यती जोमाने घेतल्या जातील-बैलगाडी संघटना”

Leave a Comment