तलाठ्याच्या पोटातून काढल्या गिळलेल्या २ हजाराच्या नोटा

पुणे,  दि.२९- लाच घेताना रंगेहात पकडले जात असल्याचे लक्षात येताच लाचेच्या नोटाच खाऊन टाकणार्‍या तलाठयाची ही लाच अखेर त्याच्या  पोटातून मिळविण्यात लाचलुचपत विभागाला यश मिळाले आहे.याविषयीही हकीकत अशी की नारायणगांव येथील तलाठी सतीश विष्णू शेळके याने एका शेतकर्‍याकडून दोन हजार रूपयांची लाच घेत असतानाच त्याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. मात्र तलाठ्याने डोके चालवून हजार रूपयांच्या या दोन नोटा खाऊन टाकल्या आणि पुरावाच नष्ट केला. मात्र लाचलुचपत विभागातील अधिकार्‍यांनी पोलिसांच्या मदतीने त्याला ताबडतोब रूग्णालयात दाखल केले व त्याच्या पोटाचे एक्सरे काढले. एक्सरेत पोटाच्या कोपर्‍यात या नोटां दिसल्या. या नोटा बाहेर काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले मात्र त्यासाठी भूल देणे भाग होते व रूग्णाच्या परवानगीशिवाय अशी भूल देणे शक्य नव्हते. हे लक्षात येताच शेळके याने भूल देण्यास नकार दिला. पण पोलिसांनीही त्याची पाठ सोडली नाही व त्याला ससूनमध्ये दाखल करून जुलाबाचे औषध देण्यात आले. अखेर पोटातून बाहेर आलेल्या विष्ठेतून दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पोलिसांना नोटांचे अंश मिळविण्यात यश आले. हे शौच तपासणीसाठी पाठविण्यात आले होते व त्यात नोटांचे अंश असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. या अहवालासोबतच पोटाच्या एक्सरेतही नोटा दिसत असल्याने पोलिसांच्या हाती आता भक्कम पुरावा लागला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Leave a Comment