अण्णा हजारे राष्ट्रपती ?

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मनमोहन सिग यांचा ७९ वा वाढदिवस साजरा झाला. ८० व्या वर्षात पदार्पण करताना त्यांनी आपली विश्वासार्हता गमावलेली आहे. देशाच्या कारभारावर आणि आपल्या मंत्रिमंडळावर पकड नसलेला पंतप्रधान अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. ती काँग्रेसला फार महागात पडणारी आहे. तेव्हा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या पदावरून हटवून त्या जागी राहुल गांधी यांना बसवावे अशी एक सूचना पुढे आली होती. आता ती मागे घेतली गेली आहे म्हणूनच सिग यांनी आपण २०१४ सालपर्यंत या पदावर राहणार आहोत असे म्हटले आहे. मात्र त्यांना हटवण्याची सूचना पुढे आली होती तेव्हा त्यांना हटवून कोठे बसवावे यावरही चर्चा झाली आणि त्यांना हटवायचे असल्यास त्यांना राष्ट*पती करावे असा प्रस्ताव मांडला गेला. आता हा प्रस्ताव आता तरी मागे पडला आहे पण विद्यमान राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या निवृत्तीची वेळ जवळ आली असल्याने त्यांच्या जागी कोणाला राष्ट्रपती केले जाईल याचीही चर्चा होणे अपरिहार्य आहे. अशी चर्चा सुरू झाली की अनेक नावे मागे पडतात आणि यथावकाश मागेही पडतात. शेवटी कोणी तरी अनपेक्षितपणे पुढे येऊन राष्ट्रपती होतो.
    आता अण्णा हजारे हे राष्ट्रपती होणार या चर्चेला  उधाण आले आहे. याला कारणही आहे. त्यांना पंतप्रधान मनमोहनसिंग यांनीच तशी ऑफर दिली आहे असे बोलले जात आहे. आता नावांची चर्चा सुरू झाली आहे आणि पहिले नाव मनमोहनसिंग आणि दुसरे नाव अण्णांचे आले आहे. अशी पहिल्यांदा समोर येतात ती नावे नंतर मागे पडतात असा आजवरचा अनुभव आहे. प्रतिभा पाटील यांची निवड होताना असेच झाले. सुरूवातीला काँग्रेस पक्षाने  सुशीलकुमार शिदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ते राष्ट्रपती झाले असते तर छानच झाले असते. ते भारताचे सर्वात देखणे राष्ट्रपती ठरले असतेच पण तुलनेने कमी वयात हे पद प्राप्त करणारे नेते ठरले असते. मात्र त्यांच्या या निवडीला मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीचा पाठींबा गरजेचा होता. मायावती यांनी या नावाला खो दिला.कारण काँग्रेसने दलित समाजातल्या नेत्याला राष्ट्रपती केले तर  या समाजाची सहानुभूती काँग्रेसकडे जाऊन आपला पाठींबा कमी होईल अशी भीती त्यांना वाटली. एकंदरीत ते नाव मागे पडले. आता पुन्हा ते नाव पुढे येण्याची शक्यता नाही कारण आदर्श प्रकरण. त्यात ते अडकले नसले तरीही त्यांचे नाव आले आहे आणि त्यांची उमेदवारी मागे पडण्यास एवढे पुरेसे आहे.
    आणखी एक देखणे नेते या प्रतिक्षेत होते पण ते देवभोळे असल्याने डाव्या नेत्यांनी त्यांना पाठींबा देण्यास नकार दिल्याने त्यांचेही नाव मागे पडले. अशी सुरूवातीची नावे मागे पडल्यावर अचानकपणे प्रतिभा पाटील हे नाव पुढे येऊन त्याच राष्ट्रपती झाल्या. आताही अण्णांचे नाव पुढे आले आहे. ते मागे पडण्यासाठीच पुढे आले आहे पण  खरेच कोणी गांभीर्याने या नावाची शिफारस केली असेल तर ही शिफारस कोणत्या रितीने केली गेली आणि त्या मागे काय तर्कशास्त्र आहे याचा शोध घेणे फारच उद्बोधक ठरणार आहे. अण्णांना ही ऑफर मनमोहनसिग यांनी दिली आहे असे सांगितले जात आहे. अर्थात यामागे त्यांचे चितन काय असणार ? अण्णा सारखे आंदोलन करून सरकारला तंग करीत आहेत. त्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. ही आंदोलने कशी हाताळावीत यावर सरकार संभ्रमात पडलेले असते. तेव्हा आता त्यांना सरळ राष्ट्रपतीच करून टाकावे म्हणजे त्यांच्या आंदोलनाचा ससेमिरा तरी संपून जाईल असे पंतप्रधानांना वाटत असावे. या प्रस्तावामागे अजून एक विचार आहे. अण्णा हे देशातल्या भ्रष्टाचार विरोधाचे प्रतिक झाले आहेत. त्यांना प्रति महात्मा गांधी समजले जायला लागले आहे. तेव्हा त्यांना राष्ट*पती केले तर आपलीही प्रतिमा सुधारून जाऊन तिचा फायदा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत करून घेता येईल असाही विचार या प्रस्तावामागे असेल.
    या चर्चेला सुरूवात झाली तेव्हा अण्णांच्या गोटात  त्याची प्रतिकूल प्रतिक्रिया उमटली. अण्णा नावाचे वादळ शांत करून त्याला राष्ट*पती भवनाच्या चार भितीत कोंडण्याचा आणि आपली पोळी भाजून घेण्याचा सरकारचा डाव असेल तर अण्णांनी या सूचनेचा अजीबात स्वीकार करू नये असे त्यांच्या चाहत्यांनी म्हटले. अण्णाही या आमिषाला बळी पडणार नाहीत. या पदासाठीचे अण्णांचे नाव मागे पडणार आहे. पण या प्रस्तावामागे सरकारची आपल्या प्रतिमेविषयीची धास्ती दिसत आहे आणि ती सुधारून घेण्यासाठी हे सरकार किती बालीश डावपेच लढवत आहे हेही दिसत आहे. या सूचनेमागे कसलीही सदिच्छा नाही. मनमोहन सिग यांचा पुन्हा पंतप्रधान होण्याचा स्वार्थ मात्र त्यामागे आहे. ते असले बालीश डावपेच लढवत असतातही. त्यांचे सल्लागारही असेच सुमार बुद्धीचे आणि स्वार्थी आहेत. याच लोकांनी भ्रष्टाचाराला पाठीशी घालून  अण्णांना जेलमध्ये टाकलेले आहे. या लोकांची भावना चांगली नाही आणि त्यांच्या निर्णयात कधीही अशी भावना दिसत नसते.

Leave a Comment