मुंबई महापालिकेची सत्ता द्या,मराठी माणसांना खड्ड्यांतून बाहेर काढू -अजित पवार

मुंबई २२सप्टेंबर- मुंबई महापालिकेची निवडणूक दरवेळी मराठी माणसाच्या मुद्यावर जिकून त्याच मराठी माणसांना शिवसेनेने खड्ड्यांच्या आणि पुराच्या पाण्याच्या संकटातून बाहेर काढले नाही. आम्हीही मराठी माणसे आहोत, आमच्या हातात सत्ता देऊन पहा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. मुंबईची सत्ता खेचून घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट*वादीची आघाडी झाली पाहिजे, हे सांगायलाही पवार विसरले नाहीत.
सभासद नोंदणी आणि आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांसंदर्भात पक्षाची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झाली. त्यानंतर पवार आणि राष्ट*वादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी प्रवक्ते मदन बाफना, महेश तपासे, हेमराज शाह हे उपस्थित होते. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांत ज्या-ज्या भागात शिवसेना-भाजपा युती मजबूत आहे, त्या भागात आघाडीमार्फत निवडणूक लढविली जाईल. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री राष्ट*वादी काँग्रेसचा असेल की काँग्रेसचा, असे विचारले असता पवार म्हणाले की, विधानसभा निवडणूक अजून तीन वर्षांवर आहे. मात्र राज्यता स्वबळावर सत्ता हवी, असे शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट*वादी काँग्रेसलाही वाटले तर त्यात गैर काय. महापालिका निवडणुकीत विकासाचा मुद्दा प्रचारात राहील. राष्ट*वादी काँग्रेसकडे पुणे आणि पिपरी चिचवड महापालिकेची सत्ता आहे आणि तेथे मुंबईपेक्षा चांगला कारभार होत आहे. मुंबई महापालिकेची सत्ता मिळाली तर सध्यापेक्षा चांगला कारभार देऊ. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, याची जाणीव ठेवून काम करु.
शरद रावांना फटकारले
मुंबई महापालिकेच्या मागण्यासंदर्भात शरद राव यांनी टोकाची भूमिका घेतली. चर्चा सुरु असताना संप घडविला, त्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले. राव यांनी यापुढे टोकाची भूमिका घेऊ नये, अशी तंबी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. हर्षदा वांजळे यांनी राष्ट*वादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी त्यांच्या जमिनीच्या संदर्भात धमकी दिली होती काय, असा सवाल करताना वांजळे आणि आपले संबंध चांगले होते. जमिनीच्या संदर्भात धमकी दिली असेल तर राज ठाकरेंनी पुरावे द्यावेत, असे आव्हान पवार यांनी दिले. याआधीही वांजळे यांनी जमिनीचे व्यवहार केले असतीलच ना, असा सवालही पवार यांनी केला.
नरेंद्र मोदींनी अपमान केला
उपोषण संपताना मुस्लिम बांधवांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मुस्लिम पध्दतीची टोपी दिली असता त्यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला हे त्यांना शोभादायक नव्हते. देशाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न बाळगणार्‍या नेत्याने दुसर्‍या धर्माचा सन्मान केला पाहिजे, अशा शब्दांत पवार यांनी मोदींचा समाचार घेतला.

Leave a Comment