थोडा असाही विचार करू

महागाई तर वाढतच आहे. ती वाढली पाहिजे असे काणीच म्हणणार नाही पण तरीही तिच्या बाबतीत सतत आरडा ओरडाच केला पाहिजे असे काही आहे का ? आपण महागाईच्या संदर्भात काही वेगळा विचार करू शकत नाही का ? बघू या तरी काही वेगळा विचार करता येतो की नाही ? मागे अमेरिकेत काही लोक एकत्र जमले होते. ते सगळे श्रीमंत होते. त्यांच्याकडे भरपूर पैसा असूनही त्यांना पैसा कमी पडत होता. एकत्रित आल्यावर त्यांचा हाच विषय चालला होता की आपल्याकडे एवढा पैसा असून  आणि आपल्याकडे एवढी चैनीची साधने असूनही आपली मने असमाधानी का आहेत ? आपण सुखी आहोत असे आपल्याला का वाटत नाही ? उपभोगाची साधने अजून मिळतच रहावीत असे सतत का वाटते ? अशी सगळी चर्चा केल्यावर ते सर्व लोक एका निष्कर्षाप्रत आले की नवनव्या वस्तूंचा उपयोग करण्यात आणि उपभोग घेण्यात सुख नाही. एखादी वस्तू वापरायला मिळावी असे वाटते. ती मिळेपर्यंत तिचे महत्त्व फार वाटते पण एकदा ती हातात पडली की तिचे काही वाटेनासे होते. मग नव्या वस्तूचे आकर्षण वाटायला लागते.
    सतत उपभोग वाढवण्यात सुख नाही. तर मर्यादित उपभोग आणि प्रदीर्घ चितन यात सुख आहे. गरजा सतत वाढवत नेल्या की त्या वाढतच जातात. त्यांना काही अंतच रहात नाही. म्हणून आपल्या गरजा कमी केल्या पाहिजेत.  माणसाच्या गरजा जेवढ्या कमी असतील तेवढे तो अधिक सुखी होतो. सतत महागाई वाढत गेली की माणूस त्रस्त होतो पण माणसाने आपल्या गरजा कमी केल्या असतील तर तो वाढत्या किमतींनी त्रस्त आणि दुःखी होत नाही.  महात्मा गांधी यांनी तर मर्यादित गरजा हेच आपल्या सुखाचे रहस्य असल्याचे म्हटले होते. काही लोक काहीही महाग झाले की लगेच आरडा ओरडा करायला लागतात. आपल्या लहानपणी कशी स्वस्ताई होती हे सांगायला लागतात. पण त्यांच्या लहानपणी सर्वांच्याच गरजा किती कमी होत्या  हे काही ते सांगत नाहीत. आपल्या घरातल्या एकेक वस्तूवर नजर टाकली तरी आपल्याला हे सहजच लक्षात येते की आपल्या घरातल्या अगदी सवयीच्या झालेल्या किती तरी वस्तू आपल्या लहानपणी आपल्या वापरातही नव्हत्या. अगदी सहज यादी करू. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला लागणारा टूथब्रश आणि पेस्ट, कानाला जवळपास चिटकलेलाच असलेला मोबाईल, गॅस, आवर्जुन एकदा नव्हे तर दिवसातून अनेकदा पिला जाणारा चहा, यातले आपल्या लहानपणी काय काय होते ?
    आपल्या कपड्यांवर नजर टाका. किती प्रकारचे कपडे आपण वापरतो ? त्यांना पैसे देऊन इस्त्री करून आणतो. त्यांना धुवायला वॉशिग मशीन आणतो. कुकर, हिटर, मिक्सर, ग्राइंडर, ओव्हन, टीव्ही, व्हीसीआर, टेप, फ्रीज, पंखे, कूलर, वातानुकूलन यंत्रणा (एसी), वाहने, संगणक, अशा किती तरी वस्तू आणि सेवा आपण खरेदी  करून ठेवलेल्या असतात. आताचे जीवन आधुनिक आणि गतिमान झाले आहे म्हणून यातल्या काही गोष्टी आपल्यासाठी आवश्यक झाल्या आहेत पण यातली प्रत्येक गोष्ट आवश्यकच आहे का आणि तिचाही आपण करतो तेवढा उपयोग गरजेचा आहे का याचा आपण विचार केला पाहिजे. यातल्या काही गोष्टी नक्कीच अनावश्यक आहेत.  पण आपण त्यांचे गुलाम झालेलो असतो त्यामुळे त्यांच्या शिवाय राहू शकत नाही आणि वीजदर कितीही वाढले तरी आपल्या वापरात काही काटकसर करण्याचा आपण विचार सुद्धा करीत नाही. तसा विचार आपण केला पाहिजे पण तो करीत नसू तर आपल्याला वाढत्या वीजदराबाबत आरडा ओरडा करण्याचा काही अधिकार नाही. आपल्या घरात किती वीज विनाकारण जळत असते याचा आपण आढावा घ्यावा मग आपल्यालाच नवा साक्षात्कार होईल.       

गॅसचे दर वाढले म्हणून लोक संतापतात पण आपण गॅसही नीट वापरत नाही. गॅसवर स्वयंपाक करतो. स्नानाचे पाणी गरम करतो पण स्नानाला फार गरम पाणी गरजेचे नसते. कोमट पाण्याने आंघोळ करावी. देवा समोर केवळ आरतीपुरतेच तेल किवा तूप जाळावे. शक्यतो अन्न पदार्थ जास्त वेळ रटारटा शिजवू नयेत. अन्न जितके कमी शिजवलेले असेल तेवढे ते सत्त्वहीन होत असते. शक्यतो कच्चे अन्न खावे. आपण किती अन्न वाया घालवत असतो याचा हिशेब करावा. वाया जाणार्‍या अन्नामुळे केवळ अन्नाचीच नासाडी होते असे नाही. आपण अन्न शिजवून मग फेकत असतो. म्हणजे ती गॅसची, तेलाची, मसाल्यांचीही नासाडी असते. याचा आपण कधी विचारही करीत नाही. महागाईचे आपल्याला फारच चटके खरेच बसत असतील तर अन्नाचा एकही कण वाया जाणार नाही अशी प्रतिज्ञा करा. मग बघा आपल्या संसाराच्या बजेटला किती बरकत येते ते ? आपण हॉटेलात किती वेळा जातो ? इकडे महागाईच्या नावाने आरडा ओरडा आणि तिकडे हॉटेलांत जेवायला येणारांची गर्दी हे दृष्य विसंगत वाटते.आता आता तर हॉटेलात केवळ गर्दीच होते असे नाही तर तिथेही ग्राहकांच्या रांगा लागलेल्या असतात. हे काय महागाईने  त्रस्त झाल्याचे लक्षण आहे का ?     
  

1 thought on “थोडा असाही विचार करू”

Leave a Comment