अरेरे मराठी मंत्री

काल केन्द्रीय मंत्रिमंडळातल्या विलासराव देशमुख यांना वगळात बहुतेक सर्व मंत्र्यांनी आपल्या मालमत्ता जाहीर केल्या आहेत.पूर्वीही अशी घोषणा होत असे तेव्हा लोकांना फार आश्चर्य वाटायचे. कारण यातल्या एकेका मंत्र्यांची चरित्रे आणि आत्मचरित्रे जनतेने वाचलेली,पाहिलेली असतात. त्यात त्यांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या गरिबीचा आवर्जुन उल्लेख केलेला असतो. आपल्या आयुष्याचा आणि महात्त्वाकांक्षेचा दिवा अनेक संकटांच्या वादळातही कसा जिवंत राहिला आहे याचे मोठे कौतुकाने वर्णन केलेले असते. पण आताची त्यांची संपत्ती ऐकून त्यांच्या गरिबीच्या पार्श्वभूमीवर ठळकपणे दिसणारे हे ऐश्वर्य  आचंबित करणारे असते. खरे तर कोणी श्रीमंत झाला म्हणून  आपल्याला काही वाईट वाटण्याचे कारण नाही. सर्वांनी श्रीमंत व्हावे यात काही गैर नाही पण आपल्या देशातले मंत्री आणि अन्यही अनेक नेते अनुचित मार्गनी आणि पदाचा गैरवापर करून श्रीमंत होतात. ते असे मार्ग अनुसरतात आणि तो वापरण्याची चटच लागते. वरच्या स्तरावर असा भ्रष्टाचार होत तेव्हा खालच्या पातळीवर कोणालाही भ्रष्टाचार करण्याची काही क्षिती वाटत नाही आणि भ्रष्टाचार समाजव्यापी होतो. म्हणून मंत्र्यांच्या अचानकपणे वाढलेल्या मालमत्ता या अशुभसूचक वाटायला लागतात. असा एक काळ होता की आपल्या देशातले अनेक ज्येष्ठ नेते पैशाच्या बाबतीत फारच निःसंग असत.

डॉ. राजेन्द्र प्रसाद राष्ट्रपती होते आणि  दहा वर्षे राष्ट्रपतीपदावर राहिल्यानंतरही त्यांनी मालमत्ता कमावली नव्हती. ते राष्ट्रपती होण्याच्या आधी पाटण्याच्या सदाकत आश्रमात काँग्रेसचा एक पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून रहात होते. राष्ट्रपतीपदावर असताना त्यांनी सरकारच्या वेतनातला एकही पैसा घेतला नाही. केवळ लाक्षणिक अर्थाने ते दहा वर्षे केवळ दरमहा एक रुपया वेतन घेत होते. निवृत्त झाल्यावर त्यांनी राष्ट्रपतीनिवास सोडले आणि ते पुन्हा सदाकत आश्रमात रहायला गेले. निधनापर्यंत ते तिथेच रहात होते. आज आपल्या मंत्रिमंडळात सगळेच मंत्री कोट्यधीश आहेत. त्यांनी आपल्या मालमत्ता मोठ्या प्रामाणिकपणाने उघड केल्या आहेत. पण त्यातल्या काही मंत्र्यांचे मालमत्तेचे आकडे दिङमूढ करणारे आहेत. त्यांनी केवळ मालमत्ता जाहीर करून चालणार नाही तर त्यांना या वाढत्या  मालमत्तेचे स्रोत कोणते याचे उत्तर द्यावे लागेल. या अतीश्रीमंत मंत्र्यांतला एकही मंत्री आपल्या मालमत्तेचे स्रोत सांगू शकणार नाही कारण हा पैसा आणि मालमत्ता गैर मार्गांनी कमावलेली असते. कालपर्यंत खायला मोताद असलेला नेता अंगावर खादीची झूल चढताच एकदम कोट्यधीश होतो ते काही उगाच होत नाही. महाराष्ट*ातले मंत्री त्याला अपवाद आहेत. काही मराठी मंत्र्यांच्या मालमत्ता फारच कमी आहेत.

शरद पवार केवळ १२ कटी ! आता शरद पवारच म्हणतायत तर हा आकडा खराच असणार. पवार साहेब  खोटे कशाला बोलतील ? पण त्यांचा हा आकडा ऐकल्यावर अनेक मराठी लोकांना काळजी वाटायला लागली आहे की केवळ १२ कोटी रुपयांची मालमत्ता असणारे पवार साहेब पंतप्रधान कसे होणार ?  पंतप्रधान व्हायला शभरेक कोटी तर सहजच लागत असतील.१२ कोटी तर आमदारकीच्या निवडणुकीलाही पुरत नाहीत. तिथे आता पवार पुन्हा माढ्यातून निवडून कसे येणार आणि एवढ्या अल्प रकमेत पंतप्रधान कसे होणार  ? जाऊ द्या झाले. मराठी माणूस असाच अल्पसंतुष्ट रहात आला आहे. ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।। ही तुकाराम महाराजांची उक्ती त्यांच्या अंगो अंगी भिनलेली आहे. पवार असे गरीब तर सुशीलकुमार शिदे त्यांच्या निम्मेच. शिदे यांना कपड्यांचा फार षौक आहे. त्यांना कोणताही कपडा छान दिसतो. सफारी पासून धोतरापर्यंत ते सर्व प्रकारचे कपडे वापरत असतात. या बाबत मंत्र्यांतून नंबरच काढायचे म्हटले तर मात्र शिदे साहेबांचा नंबर पहिला नक्कीच नाही. त्यांना कपड्यात पहिला क्रमांक दिला तर उगाच एका मंत्र्यावर अन्याय केल्यागत होईल. ते मंत्री कपड्यांवरूनच वरपर्यंत चढले आणि एके दिवशी कपड्यांनीच त्यांचा घात केला. तेव्हा शिंदे साहेबांचा नंतर कपड्यात तरी दुसरा. एकदा एका राजकीय निरीक्षकाने त्यांच्या कपड्यावर अभ्यासपूर्ण टिप्पणी करताना, शिदे साहेबांचे सगळे कपडेच पाच ते सहा कोटी रुपयांचे असतील असे म्हटले होते. काल त्यांची मालमत्ता जाहीर झाली तेव्हा आमची घोर निराशा झाली. त्यांचे कपडेच पाच ते सहा कोटीचे असतील या म्हणण्यातली अतिशयोक्ती लक्षात आली कारण त्यांची एकूण मालमत्ताच केवळ सात कोटी रुपयांची आहे. किती का असेना पण तेही पंतप्रधान होऊ शकत नाहीत असे लक्षात आले. कारण सात कोटीत काय होणार ?

तशी काही वेळ आलीच तर घोडेबाजारासाठी सगळी मालमत्ता पणाला लावत नसतात. अशा कामात केवळ बचत खात्यावरची रक्कम वापरायची असते. शिंदे साहेबांकडे ती तर काही लाखातही नाही. एकंदरीत आपले महाराष्ट्रतले हे दोन नेते भलतेच गरीब निघाले. आता सार्‍या आशा विलासरावांवर केन्द्रित झाल्या आहेत त्यांनी अजूनही मालमत्ता जाहीर केलेली नाही. त्यांना मालमत्ता मोजायला वेळ लागणार आहे असे सांगण्यात आले. हे कारण ऐकून बरे वाटले. विलासराव देशमुख यांच्याकडे  एवढी गडगंज मालमत्ता आहे की ती मोजायला त्यांना वेळच मिळत नसावी.  ते शरदराव आणि सुशीलकुमार यांच्या पेक्षा नक्कीच श्रीमंत असणार अशी खात्रीच वाटायला लागली. देव करो आणि त्यांचीही मालमत्ता अशी या दोघां गरीब मंत्र्यांप्रमाणे आमदार आणि नगरसेवकांच्या तोडीची नसावी. ते तरी अब्जाधीश असतील अशी आशा करू या ! विलासरावजी सारा महाराष्ट्र आपल्यावर आशेन नजर लावून बसला आहे, तुम्ही तरी या संतांच्या भूमीला शोभणार नाही असे ऐश्वर्य आपल्याकडे आहे हे दाखवून द्या. एखादी बाहुली इकडे तिकडे  झाली तरी चालेल पण वेळ लावू नका. लवकर जाहीर करा आपला खजिना. आम्हाला ऐकून तृप्त होऊ द्या.

Leave a Comment