कुचाळक्यांना ऊत

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादाने डोळे फिरलेल्या काही कुचाळांनी अण्णांच्या बदनामीचे अश्लाघ्य प्रयत्न सुरू केला आहे. या सबंधात दोन गोष्टी सांगण्यात येत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अण्णाच स्वतः भ्रष्ट आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी तर अण्णांना भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले ठरवून टाकले. आधार काय तर न्या. सावंत यांच्या आयोगाचा अहवाल. या अहवालात अण्णांच्या हिद स्वराज्य ट्रस्टने अण्णांच्या ६० व्या वाढदिवसावर दोन लाख रुपये खर्च केले असे म्हटले आहे. या पलीकडे अण्णांवर कसला आरोपही झालेला नाही आणि कसली चौकशीही झाली नाही.महाराष्ट्रतले जळगावचे नेते सुरेश जैन हेही एवढ्या एका आरोपावरून अण्णांना नेहमी भ्रष्ट म्हणत असतात. पण आपण वादासाठी हे गृहित धरू की, अण्णांवर झालेला हा आरोप खरा आहे. पण त्यावरून अण्णा भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहेत असे म्हणता येईल का ? पण काँग्रेसचे नेते सतत हाच जप करीत असतात. हा आचरटपणा नाही का ?
    अण्णा हजारे हे भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ आहेत. ते सरकार आणि मंत्री यांची झोप उडवतात. अशा माणसाने असा काही भ्रष्टाचार केला असता तर त्याला सरकारने मोकळे सोडले असते का ? किबहुना याच आरोपात अण्णांना अडकवून आत टाकण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने केलाही होता पण या संबंधात नेमलेल्या सुखटनकर समितीने अण्णांचा यात काही दोष नसल्याचा निर्वाळा दिला.  असे असतानाही मनिष तिवारी यनी अण्णांना भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले असल्याचे ठरवले.  अण्णांच्या आंदोलनाने काँग्रेसचे काही नेते किती बावचळले आहेत हे कळते. आता काँग्रेसच्या काही नेत्यांनी आणि वृत्तपत्रांनी अण्णांना अमेरिकेचा हस्तक ठरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या संबंधात वडाची साल पिपळाला लावण्याचा प्रयत्न चालला आहे. अण्णांनी उपोषण सुरू करण्याच्या आधी अमेरिकेच्या सरकारने या उपोषणाचा विषय सरकारने चांगला हाताळावा असा संदेश सरकारला पाठवला. पण एवढ्यावरून या कारस्थानी मंडळींनी अण्णा अमेरिकेचे हस्तक आहेत असा प्रचार करण्याची संधी घ्यायला सुरूवात केली आहे. तसे थेट म्हणण्याची त्यांची  हिमत नाही. म्हणून हे लोक अमेरिकेने असा संदेश पाठवण्याचे कारण काय ? असा प्रश्न विचारून बरेच काही सूचित करण्याची धडपड सुरू केली आहे.
    आता या लोकांचा आपण समाचार घेतला नाही तर या बेजबाबदार लोकांच्या जिभा फारच वळवळायला लागतील. तेव्हा त्यांचे या प्रचारामागचे अंतरंग उघड केलेच पाहिजे. एक काळ असा होता की, भारतात समाजवादाचे गारूड प्रभावी होते. तेव्हा अमेरिकेचा हस्तक असणे ही शिवी मानली जात होती. आता तर आपले पंतप्रधान अमेरिकेला शरणच आलेले आहेत. त्यांनी सर्वांचा विरोध पत्करून अमेरिकेतल्या कालबाह्य यंत्रसामुग्रीवर भारतात  अणु प्रकल्प उभारण्याचा किती अट्टाहास केला होता हे आपण जाणतोच. तेव्हा अमेरिकेचे खरे मित्र तर मनमोहन सिग हेच आहेत. ते भारतात सत्तेवर असावेत अशी अमेरिकेची इच्छा आहे. म्हणून अमेरिकेने त्यांना हा सल्ला दिला आहे. हे प्रकरण हाताळताना लोक फार चिडतील असे मनमोहन सिग यांनी काहीही करू नये आणि या आंदोलनातून मनमोहनसिग यांचे पंतप्रधानपद जाऊ नये असे अमेरिकेला वाटते. हा सल्ला अण्णा हजारे यांच्या बाजूने नाही तर तो मनमोहनसिंग यांच्या बाजूने आहे. खरे तर हा भारताच्या अंतर्गत व्यवहारातला हस्तक्षेप आहे पण आपल्या सरकारने या हस्तक्षेपाबद्दल अमेरिकेला दटावले नाही. खरे तर सरकारने याबाबत अमेरिकेचा निषेध करायला हवा होता. पण मनमोहन सिंग हे किती अमेरिका धार्जिणे आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. ते अमेरिकेचा निषेध कसा करतील ?
    अमेरिकेने असा हस्तक्षेप करण्यामागे पंतप्रधानांनी हे प्रकरण नीट हाताळावे ही भावना तर होतीच पण आपले पंतप्रधान ते नीट हाताळणार नाहीत अशी भीतीही होती. कारण अमेरिकेला मनमोहन सिंग यांची अशी प्रकरणे हाताळण्याची क्षमता किती कमी आहे हे माहीत आहे. गंमतीचा भाग म्हणजे मनमोहनसिंग यांनी अमेरिकेचा हा अंदाज खरा ठरवला आहे. एकंदरीत अमेरिकेच्या या सल्ल्याचा अण्णांशी काही संबंध नाही ते अमेरिका आणि मनमोहन सिंग यांच्यातल्या प्रेमाचे प्रतिक आहे. अमेरिका अण्णांना हस्तक कशाला बनवील? राळेगण सिद्धीच्या मोहिनीराज मंदिरात साध्या चटईवर झोपणारा हा फकीर अमेरिकेला काही देऊ शकत नाही. या आंदोलनच्या जाहीराती काही वृत्तपत्रांत आल्या याचाही विपरीत अर्थ काढला जात आहे. अण्णांच्या मागे एवढे लोक कसे जमा झाले याचाही काही अर्थ काढला जात आहे. त्याचे कोडे काँग्रेस नेत्यांना पडले आहे. साहजिक आहे. काँग्रेसच्या सभांना ट्रकमध्ये भरभरून माणसे आणावी लागतात त्यामुळे कोणाच्या तरी मागे गर्दी उभी रहात आहे याचे वैषम्य त्यांना वाटणारच. या गर्दीचा कोणताही अर्थ नाही. लोकांना जे हवे आहे ते अण्णा मागत आहेत हेच गर्दीचे रहस्य आहे.

Leave a Comment