अब्दुल तेलगीची पुण्याच्या येरवडा तुरूंगात रवानगी

पुणे – मुद्रांक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी याला कर्नाटक उच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणावरून जामीन मंजूर केला असतानाच त्याची बंगलोर येथील तुरूंगातून पुण्याच्या येरवडा तुरूंगात रवानगी करण्याची तयारी सुरू झाली असल्याचे समजते. यामागे तेलगीची जामीनावर सुटका होऊन तो तुरूंगातून सुटू नये हेच कारण असल्याचा आरोप तेलगीच्या पत्नीने केला आहे.
मुदा्रांक घोटाळा प्रकरणातील विविध आरोपावरून तेलगी गेली दहा वर्षे बंगलोरच्या तुरूंगात शिक्षा भोगत आहे. त्याला अनेक व्याधी असल्याने प्रकृतीच्या कारणास्तव त्याने जामीनासाठी अर्ज केला होता. कर्नाटक उच्च न्यायालयातील न्यायाधीशंानी शनिवारी त्याचा अर्ज मंजूर करून त्याला जामीन मंजूर केला. तेलगीची पत्नी शाहिदा त्याला बंगलोरच्या तुरूंगात भेटावयास गेली तेव्हा तेलगीने तिला आपल्याला पुण्याच्या येरवडा तुरूंगात हलविण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती दिली. आपल्याला जामीनावर सोडले नाही तर आपण आत्महत्या करू असेही तो म्हणाल्याचे शाहिदा सांगते. तेलगीची प्रकृती खरेाखरच बरी नसून तो चाकाच्या खुर्चीशिवाय हलू शकत नाही. या परिस्थितीत त्याला पुण्याचा प्रवास झेपणार नाही. शिवाय त्याच्यावर पुण्यात सध्या कोणताच खटलाही सुरू नाही. मग त्याला पुण्याला का आणले जात आहे असे तिचे म्हणणे आहे.
बंगलोरच्या मध्यवर्ती कारागृहाच्या महानिरीक्षकांनीही तेलगीला पुण्याच्या येरवडा कारागृहात पाठविण्यात येत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तेलगीला पुण्याच्या येरवडा कारागृहातूनच बंगलोरच्या कारागृहात आणण्यात आले होते, तेव्हाच त्याला परत त्या कारागृहात पाठविले जाईल या अटीवरच आणण्यात आले होते असे सांगून ते म्हणाले की आम्ही केवळ आदेशाचे पालन करतो आहेात. तेलगीला मोक्का खाली अटक करण्यात आली होती आणि त्यात जामीनाची तरतूद फारशी महत्त्वाची नाही असेही ते म्हणाले.
तेलगीचे वकील मिलिद पवार यांनीही तेलगीला १-२ दिवसांतच पुण्याला पाठविले जाईल अशी माहिती दिली. येरवडा कारागृहाचे महानिरीक्षक शरद खटवलकर यांनी मात्र त्यांच्याकडे त्यासंदर्भातले अधिकृत पत्र अद्याप आले नसल्याचे सांगितले. येरवड्यातून चार वर्षांपूर्वी तेलगीला बंगलोरच्या कारागृहात हलविण्यात आले होते असेही ते म्हणाले.येरवडा येथील कारागृहात तेलगीने आत्मचरित्र लिहायला सुरवात केली होती. बंगलोरच्या तुरूंगात त्याला हलविल्यानंतर त्याचे आत्मचरित्राचे कागद बंगलोरला २००६ सालीच रवाना केले असल्याचे येरवडा कारागृहाकडून सांगण्यात आले होते मात्र आजतागायत ते कागद तेलगीला मिळू शकलेले नाहीत असेही वकील मिलिद पवार यांनी सांगितले.

Leave a Comment