येडीयुरप्पा हटले पण….

कर्नाटकातल्या लोह खाणीच्या व्यवहारात लोकायुक्तांनी दोषी ठरवलेले मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली असल्याने भाजपा पक्षश्रेष्ठींनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे पण ते अजून प्रत्यक्षात राजीनामा देत नसल्याने पक्षापुढे नव्या अडचणी उभ्या रहात आहेत. येडीयुरप्पा  हे कमालीचे अंधःश्रद्ध आहेत. त्यांनी आपल्या नावाच्या इंग्रजी स्पेलिंग करताना एका ऐवजी दोनवेळा डी अक्षर लिहून येडीयुरप्पा ऐवजी येड्डीयुरप्पा केले तर त्यांच्या पुढच्या अडचणी कमी होतील असे एका मांत्रिकाने त्यांना सांगितले होते आणि त्यानुसार या गृहस्थाने आपल्या नावाचे स्पेलिग बदलले होते. नावाच्या स्पेलिगमध्ये अजून एक डी घातला म्हणून कोणत्या ग्रहाची आणि का शांती होणार होती हे काही माहीत नाही पण, येडीयुरप्पांना डी (म्हणजे दाऊदची) बाधा झाली. त्यांनी जिंदल कंपनीकडून २० कोटी रुपये घेतले. लोकायुक्त हेगडे यांनी २५ हजार पानांचा अहवाल तयार केला आहे. यासाठी त्यांनी केलेले कष्ट खरोखरच वाखाणण्याजोगे आहेत. त्यांनी आपल्या अहवालात नेमके काय म्हटले आहे याचा उलगडा अजून व्हायचा आहे. पण त्यांनी काढलेल्या निष्कर्षात मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची राज्याच्या तिजोरीला बसलेली झळ १५ हजार कोटी रुपयांची आहे.

येडीयुरप्पा यांचे दिल्लीतले गॉड फादर नेमके कोण यावर वाद आहे. या बाबत सुषमा स्वराज आणि अरुण जेटली परस्परांकडे बोट दाखवत आहेत पण जे कोणी असतील त्यांना आपले दक्षिणेतले हे पहिले पाऊल किती अनाचार करीत आहे याचा पत्ता का लागला नाही आणि लागला असेल तर त्यांनी पक्षाला वेळीच सावध का केले नाही ? हिमाचल प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री शांताकुमार यांना या गोष्टीची माहिती होती कारण ते काही दिवस पक्षाचे कर्नाटकातले प्रभारी होते. त्यांनी येडीयुरप्पा यांचा हा सारा प्रकार जवळून पाहिला होता. काही दिवसांनी त्यांनी आपले हे पद सोडून दिले आणि आता आता अगदी गेल्या आठवड्यात भाजपातही घराणेशाही शिरली असल्याचे परखडपणे म्हटले. आता अगदी गळ्याशी आल्यावर मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे पण पुन्हा अंधःश्रद्धा आडवी आली आहे. आषाढ महिन्यात राजीनामा न देता श्रावण महिन्यात राजीनामा दिला तर त्यांना पुन्हा सत्ता मिळणार आहे. तेव्हा आपण ३१ तारखेला राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान त्यांचा वारस कोण असावा यावर चर्चा सुरू आहे पण, या दोन दिवसात येडीयुरप्पा हे काही नवी गडबड करणार नाहीत ना याची चिता श्रेष्ठींना लागली आहे.

भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे, व्यक्तीपेक्षा  पक्ष मोठा आणि पक्षापेक्षा देश मोठा पण, आता पदावरून जाताना येडीयुरप्पा राज्यातला भारतीय जनता पक्ष आपल्यामुळेच आहे अशा वल्गना करायला लागले आहेत.  परिणामी आपण मुख्यमंत्री नसलो तरीही पक्षावर आपलेच वर्चस्व असले पाहिजे असा अट्टाहास ते करत आहेत. ते पक्षापेक्षा मोठे नसले तरीही पक्षाला हानंी पोचवण्याची ताकद त्यांच्यात आहे हे नाकारता येत नाही म्हणून त्यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्त करेपर्यंत भाजपा श्रेष्ठींच्या जीवात जीव राहणार नाही हे खरे. भारतीय जनता पार्टीचे नेते पक्षापेक्षा मोठे का होत आहेत याचा विचार पक्षाने केला पाहिजे. येडीयुरप्पा यांनी जाता जाता आपल्या हितचितक आमदारांची बैठक बोलावली होती आणि तिला आठ मंत्री तसेच ३२ आमदार उपस्थित होते. तेवढे तरी आमदार उपस्थित राहतात याचा अर्थ असा होतो की हे आमदार भाजपापेक्षा येडीयुरप्पांना मानतात.

भाजपा हा  उत्तरेतला पक्ष आहे. त्याला केन्द्रात स्वबळावर सत्ता मिळवायची असेल तर उत्तरेतला पहिल्या क्रमांकाचा आणि दक्षिणेतला दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष असे स्थान त्याला मिळवावे लागेल असे पक्षातर्फे सांगितले जात असते. ती पक्षाच्या दृष्टीने आदर्श स्थिती असेल तर त्याला अजून बरीच वाटचाल करायची आहे. कारण दक्षिणेत कर्नाटक वगळता एकाही राज्यात पाय ठेवायलाही जागा नाही. तामिळनाडू आणि केरळात तर आजवर पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही. केरळात तिसरी शक्ती म्हणून स्थान मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाही. आंध्रातली आमदारांची संख्या अजून एक अंकी आहे. अशा वेळी कर्नाटकात पडलेले पाऊल भक्कम असायला हवे होते पण हे पाऊल इतके वेडेवाकडे पडले आहे की तेच  आता शेवटचे पाऊल ठरेल की काय याची भीती वाटत आहे. भाजपाने केन्द्रातल्या मनमोहनसिंग सरकारला भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून लक्ष्य करण्याचे ठरवले आहे. पण  स्वतः भाजपाचेच हात भ्रष्टाचाराने बरबटलेले असतील तर भाजपाला काँग्रेसवर टीका करण्याचा काही अधिकार उरणार नाही असे म्हटले जात होते पण आता येडीयुरप्पा यांना हटवल्याने भाजपाला हा अधिकार निर्विवादपणे प्राप्त होणार आहे असे काही म्हणता येत नाही कारण तसा येडीयुरप्पांचा राजीनामा काही नैतिक भूमिकेवरून वगैरे दिलेला नाही. भ्रष्टाचार केल्याबद्दल दिला आहे. म्हणजे भाजपाचे मुख्यमंत्री एवढा भ्रष्टाचार करतात असे दिसून आले आहे.

Leave a Comment