मुख्यमंत्र्यांचे गिरणी कामगारांना ठोस आश्वासन,शिवसेनेने मुंबई बंद पुढे ढकलला

मुंबई – गिरणी कामगार संघटनांच्या प्रमुख नेत्यांसोबत शनिवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासने मिळाल्यामुळे शिवसेना-भाजपा-रिपाइंने १ ऑगस्ट रोजी पुकारलेला संभाव्य मुंबई बंद पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा महायुतीने केली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळेच हा बंद पुढे ढकलत असल्याची घोषणा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित होते.
शुक्रवारी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या वर्षा निवासस्थानावर गिरणी कामगार नेत्यांची बैठक आयोजित केली होती. १ जानेवारी १९८२ रोजी हजेरीपटावर असलेल्या गिरणी कामगारांना अथवा त्यांच्या वारसांना घर देण्याची प्रमुख मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. मात्र या घरांची किमत तसेच त्यांना अधिकाधिक किती घरे देता येतील, याची चाचपणी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी बैठकीस उपस्थित ९ संघटनांच्या प्रतिनिधींसमोर ठेवला. या प्रस्तावास सर्वांनी मान्यता दिली. या समितीमध्ये सर्व ९ संघटनांच्या कामगार नेत्यांचाही समावेश करण्यात येणार आहे.
या समितीने घरांची किमत पुढील दोन महिन्यात आणि घरांची संख्या पुढील तीन महिन्यात ठरवावी असेही या बैठकीत निश्चित करण्यात आले, अशी माहिती कामगार नेत्यांनी पत्रकारांना दिली. मुख्यमंत्र्यांनी कामगार नेत्यांना वस्तुस्थितीची माहिती देऊन, सहकार्याची अपेक्षा व्यत्त* केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी गिरणी कामगारांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्यामुळे या सर्व नेत्यांनी समाधान व्यत्त* केले. यानंतर सर्व कामगार नेत्यांनी शिवसेना-भाजपा-रिपाइंच्या नेत्यांची भेट घेऊन संभाव्य मुंबई बंदबाबत चर्चा केली. यानंतर महायुतीच्या नेत्यांनी देखील १ ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेला बंद पुढे ढकलण्याची घोषणा करून मुंबईकरांना दिलासा दिला.
मुख्यमंत्र्यांनी आपल्याला फोन करून बंद मागे घेण्याची विनंती केली. मात्र हे आंदोलन ज्या गिरणी कामगारांकरिता आहे, त्यांच्या नेत्यांशी आपण चर्चा करा. हेच नेते मुंबई बंदबाबत निर्णय घेतील, असे आपण मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. देशाच्या विविध प्रश्नांसाठी नेहमी आंदोलने करणार्‍या गिरणी कामगारांचे प्रश्न सरकार गंभीरपणे घेत नव्हते. त्यामुळेच महायुतीने कामगार संघटनांच्या पाठी  आपली ताकद उभी करण्याचा निर्णय घेतल्याचे ठाकरे म्हणाले. आवश्यकता भासल्यास दोन महिन्यांनी पुन्हा कामगारांच्या मागे उभे राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने तूर्त गिरणी कामगारांना ठोस आश्वासने दिली असून, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दोन-तीन महिन्यांचा वेळ मागितला आहे. त्याकरिता सोमवारचा बंद आम्ही पुढे ढकलत असल्याचे भाजपाचे लोकसभेतील विरोधी पक्ष उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केले. सरकार गिरणी कामगारांच्या मागण्यांबाबत टोलवाटोलवी करीत असल्यामुळेच आम्हाला मुंबई बंद पुकारावा लागला, असे रिपाइं नेते रामदास आठवले म्हणाले.
शुक्रवारी विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना कामगारांना दिवास्वप्ने दाखवू नका, असे आवाहन केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी सरकारने सुद्धा भूलथापा मारू नयेत, असा टोला लगावला. दुःखात असलेला कामगार तुमच्यावर विश्वास ठेवून सरकारला सहकार्य करीत आहे. मात्र जर या कामगारांचा विश्वासघात झाला तर येत्या काळात प्रचंड मोठे आंदोलन उभे करू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.  

1 thought on “मुख्यमंत्र्यांचे गिरणी कामगारांना ठोस आश्वासन,शिवसेनेने मुंबई बंद पुढे ढकलला”

  1. Your Name ramchandra b pawar

    १ जानेवारी १९८२ नतर कामावर रुजु झालेल्या कामगाराना घरे मिलनार का ?

Leave a Comment