ज्येष्ठ समाजसेविका साधनाताई आमटे यांचे निधन

चंद्रपूर – ज्येष्ठ समाजसेविका साधनाताई आमटे यांचे शनिवारी दुपारी प्रदीर्घ आजाराने आनंदवन येथे निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या. ज्येष्ठ समाजसेवक पद्मविभूषण डॉ. बाबा आमटे यांच्या त्या पत्नी होत . त्यांच्यामागे डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश ही दोन मुले, मंगला मनोहर ही दत्तक कन्या सुना  नातवंडे, जावई आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. रविवारी सकाळी १० वाजता आनंदवनातून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून आनंदवन परिसरात ज्या ठिकाणी बाबा आमटे यांचा मृतदेह पुरण्यात आला त्याच्याच बाजूला साधनाताईंच्या पार्थिवालाही समाधी दिली जाणार आहे.

गेल्या तीन महिन्यापासून साधनाताई आजारी होत्या. सुरुवातीला नागपूरात अवंती विशेषोपचार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. नंतर आपल्याला आनंदवन या आपल्या कर्मभूमीतच राहायचे अशी इच्छा त्यांनी व्यत्त* केल्यामुळे त्यांना आनंदवनला हलवण्यात आले होते. आणि आनंदवन येथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज शनिवार संध्याकाळी ४.५० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. पोळ त्यांचे चिरंजीव डॉ. विकास आमटे, जावई विलास मनोहर, नातू कौस्तुभ आमटे हे त्यांच्याजवळ होते.

साधनाताईंच्या मृत्यूची बातमी ताबडतोब वरोरा परिसरात पसरताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी वरोरा येथे धाव घेतली. चंद्रपूरचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर आनंदवनात दाखल झाले. त्यात प्रा. मदन धनकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळू धानोरकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा भाबरे प्रभृतींचा समावेश होता. साधनाताईंचे मानसपुत्र आणि ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार हेही आनंदवनात पोहोचले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या चाहत्यांनी रांगा लावल्या होत्या. संपूर्ण आनंदवनात शोकाकुल वातावरण जाणवत होते.

साधनाताईंचा जन्म ५ मे १९२६ रोजी नागपूरातील घुले या सनातनी धार्मिक कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण नागपूरच्या जामदार हायस्कूलमध्ये झाले. त्या काळात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असलेली मुरलीधर देवीदास आमटे काही निमित्ताने  घुले परिवारात येऊ लागले आणि त्यांनी त्यावेळेच्या इंदू घुले यांना सरळ मागणी घातली. सनातनी आणि कर्मठ असलेल्या घुले परिवाराचा या विवाहाला विरोध होता. मात्र इंदू घुले यांनी ठाम राहून होकार दिल्यामुळे १८ डिसेंबर १९४६ रोजी रोजी त्या मुरलीधर देवीदास उपाख्य बाबा आमटे यांच्याशी विवाहबद्ध होऊन साधना आमटे झाल्या.

विवाहानंतर साधनाताई बाबा आमटेंसोबत वरोरा येथे आल्या. काही काळ बाबा आमटे यांनी वकीली केल्यावर त्यांनी वरोर्यायजवळच्या जंगलात कुष्ठरोग्यांसाठी निवासी रुग्णालय आणि सेवाकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी साधनाताई ठामपणे त्यांच्यासोबत उभ्या राहिल्या आणि जंगलात निवासाला आल्या. त्यानंतर बाबा आणि साधनाताई यांनी अथक परिश्रम करून आजचे आनंदवन उभारले. १९४६ पासून ते फेब्रुवारी २००८ पर्यंत म्हणजे बाबांच्या निर्वाणापर्यंत साधनाताई सावलीसारख्या बाबांसोबत राहिल्या. कुष्ठरोग हा संसर्गजन्य नाही हे सिद्ध करण्यासाठी आणि कुष्ठरोग्यांना समाजात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले.

आमटे दाम्पत्याला विकास आणि प्रकाश अशी दोन मुले झाली. मात्र कुष्ठरोग हा संसर्गजन्य नाही हा समाजाला संदेश देण्यासाठी साधनाताईंनी कुष्ठरोगी दाम्पत्याची मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्णत्वाला नेला. मंगला नामक त्यांचे तिसरे अपत्य म्हणजेच ही कुष्ठरोगी दाम्पत्याची मुलगी होय. या मुलीला त्यांनी पालकत्व दिले आणि लहानाची मोठी करून तिचा विवाहही करून दिला. विलास मनोहर हे तिचे पती हे देखील बाबांच्या कामाने प्रेरित होऊन आमटे परिवाराने गडचिरोली जिल्हयात उभारलेल्या हेमलकसा येथे काम करीत आहेत.

साधनाताईंनी कुष्ठरोग्यांबरोबर अपंग, अंध, आदिवासी अशा अनेकांवर मायेची पाखर घातली. सगळ्या आनंदवनाची ताई म्हणूनच त्या ओळखल्या जात होत्या. त्यांच्या या निरलस समाजसेवेची समाजाच्या विविध स्तरातून दखल घेतली गेली. महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार, फाय फाऊंडेशनचा पुरस्कार, दिवाली बेन मेहता ट*स्टचा मिलेनियन अवॉर्ड, ग.दी.मा. प्रतिष्ठानचा, गृहिणी सखी सचिव पुरस्कार, मिनाताई ठाकरे ट्रस्टचा मातोश्री पुरस्कार, चतुरंग प्रतिष्ठानचा जिवनगौरव पुरस्कार, जयताई मातृगौरव पुरस्कार, तुळजाई स्त्रीशक्ती पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. बाबांसोबतच्या सहजीवनावर आधारित त्यांनी २००१ मध्ये लिहिलेल्या संविधा या आत्मचरित्र्याच्या मराठीत पाच आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून कन्नड, हिदी आणि इंग्रजीमध्ये त्याचे भाषांतरही प्रकाशित झाले आहे.

रविवारी सकाळी आनंदवनात साधनाताईंच्या पार्थिवावर होणार्या  अंत्यसंस्कारासाठी बरेच मान्यवर आनंदवनला येण्याची शक्यता असून त्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

1 thought on “ज्येष्ठ समाजसेविका साधनाताई आमटे यांचे निधन”

Leave a Comment