अभद्र युती आणि लूट

     केंद्रात उघड होत असलेला २ जी स्पेक्ट्रम घोटाळा  हा राजकीय नेते आणि उद्योगपती यांच्या अभद्र युतीतून साकार झालेला घोटाळा आहेच पण या घोटाळ्यात झालेली एक वाईट गोष्ट म्हणजे मंत्रिपदाचे लाभ पाहून काही नेतेच स्वतः उद्योगपती होण्याच्या मागे लागले आहेत. मारन यांनी तसाच प्रयत्न केला होता. परिणामी त्यांना आता आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. ते २००४ ते २००६ या काळात द्रमुकचे प्रतिनिधी म्हणून केन्द्राच्या मंत्रिमंडळात दूरसंचार मंत्री होते. या काळात त्यांनी तोच स्पेक्ट्रम कार्यक्रम राबवला होता जो त्यांच्यानंतर ए. राजा यांनी राबवला. २००६ साली दयानिधी मारन आणि द्रमुक नेते करुणानिधी यांच्यात बेबनाव झाला होता. त्यामुळे मारन यांनी राजीनामा दिला. या काळात मारन आणि करुणानिधी या दोन कुटुंबातले संबंध ताणलेले राहिले. ते नंतर सुरळीत झाले पण दरम्यान कल्पवृक्ष ठरलले दूरसंचार खाते ए. राजा यांच्या हातात गले होते. या खात्यात ए. राजा यांनी करुणानिधी यांचा अजेंडा ठीकपणे राबवत आणला होता. त्यामुळे दयानिधी मारन यांना पुन्हा ती दुभती गाय मिळाली नाही. त्यांना अबकारी खात्यावर समाधान मानावे लागले. २००६ ते २००९ या काळात ए. राजा यांनी दूरसंचार खात्याचे योग्य ते दोहन केले आणि टाटा पासून बलवापर्यंत सर्वांना मालामाल करणारी २ जी स्पेक्ट्रम नीती अवलंबिली. त्यामुळे २००९ सालीही पुन्हा ए. राजा यांनाच दूरसंचार मंत्री करावे असा सर्वांनी आग्रह धरला. या सर्वांत टाटा पासून बलवा पर्यंत अनेक जण होते. आणि त्या सर्वांच्या वतिने नीरा राडिया आणि काही पत्रकारही प्रयत्न करीत होते.  या सर्वांच्या दबावाला बळी पडून पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी ए. राजा यांना दूरसंचार खाते दिले. मात्र त्यांच्या पूर्वी या खात्यात मारन यांनी  ए. राजा यांच्याप्रमाणेच  २ जी स्पेक्ट्रम च्या वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेतले होते.  हा सारा प्रकार पाहिला म्हणजे २ जी स्पेक्ट्रम ची लूट करण्याचे किती मोठे कारस्थान या देशात सुरू होते याचा बोध होतो. मात्र या प्रकरणात एक गोष्ट कोणाच्या लक्षात आलेली नाही की, २ जी स्पेक्ट्रम मध्ये असे लाभ करून घ्यावेत हा काही ए. राजा यांचा एकट्याचाच अजेंडा नव्हता. तो अजेंडा दयानिधी मारन यांनीही राबवला होता. याचा अर्थ हा कोणा व्यक्तीचा अजेंडा नसून द्रमुक पक्षाचा आणि टाटा, बलवा, अंबानी, मारन, राजा यांचा संयुक्त कार्यक्रम होता. या सगळ्यांच्या मुळाशी करुणानिधी आहेत. सीबीआयने या अँगलने या प्रकरणाचा तपास केला पाहिजे. मारन गेले आणि राजा आले तरीही या प्रकरणातली कार्यपद्धती तीच राहिलेली आहे. स्पेक्ट्रमचे परवाने स्वस्तात देणे, बोगस कंपन्या उभ्या करणे,  त्यांनी ते परवाने मोठ्या परदेशस्थ कंपन्यांना विकणे आणि या बदल्यात करुणानिधी यांचे कुटुंबीय आणि बगलबच्चे यांना खुष होऊन काही तरी देणे. ज्या अर्थी हे असेच होत आले आहे त्या अर्थी यामागे करुणानिधी सारखा कोणी तरी मास्टर माइंड असलाच पाहिजे.    

राजा आणि कनिमोझी प्रकरणात २ जी स्पेक्ट्रम मधील लाभापोटी स्वान टेलीकॉम आणि अंबानीच्या डमींनी कलैग्नार टीव्हीला २०० कोटीचे कर्ज दिले. या कर्जाची या वाहिनीला काही  गरज नव्हती. तिने कोणाला कर्ज मागितलेही नव्हते आणि कर्ज घेऊन विस्तार कामासारखे काही करण्याची वाहिनीची योजनाही नव्हती. मग ते कर्ज घेतले कशाला ? गंमत म्हणजे काही दिवसांत ते परतही केले. मग कर्जाचा कसा उपयोग करून ते कर्ज फशडले याचा काही खुलासा नाही. मुळात हे कर्ज नव्हतेच. करुणानिधी आणि कंपनीने पैसे खाण्याची ही नवी युक्ती काढलेली आहे.मारन यांनी तर ही युक्ती राजा यांच्या आधीच अंमलात आणली होती. या सार्या  प्रकरणात अशी छुपी लाच देणारे बलवा, स्वान कंपनीचे संचालक आणि अनिल अंबानीच्या कंपनीचे अधिकारी अटकेत पडले आहेत. ही लाच घेणारी कनिमोझीही आतच आहे. आता मारन, त्यांचा मलेशियातला मित्र आणि बंधू कलानिधी मारन यांना तिहार आश्रमाची यात्रा करावीच लागणार आहे पण अशाच रितीने रतन टाटा यांनीही २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचे लाभ घेतले आहेत आणि आपली करोडो रुपयांची चेन्नईतली इमारत काही लाखात  करुणानिधी यांच्या पत्नीच्या नावे करून दिली आहे. ही गोष्टही  अशीच या कारस्थानातल्या प्रमाणे घडली आहे पण टाटा यांना अजून तरी सीबीआयने आपल्या निशान्यावर ठेवलेले नाही. २ जी स्पेक्ट्रम प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली सीबीआय तर्फे सुरू आहे आणि आजवर सीबीआयने बर्या च लोकांच्या विरुद्ध फासे आवळले आहेत. आता मारन यांच्या रूपाने या प्रकरणाचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे. या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती देण्यासाठी काल सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाला आपला अहवाल सादर केला आणि त्यामध्ये दयानिधी मारन यांच्याही नावाचा उल्लेख केला आहे. अजून या प्रकाराची चौकशी सुरू आहे आणि योग्य वेळ येताच त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले जाईल, असेही सीबीआयने नमूद केले आहे.  यथावकाश मारन तुरुंगात जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment